आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाची दाहकता : मोसंबीची बाग वाळली, द्राक्ष बागेच्याही काड्या, ३४ जणांचे डोळे पाणावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मराठवाड्यातील दुष्काळाचा जबरदस्त फटका यंदा मुखेड तालुक्यातील बिहारीपूरच्या गंगाधर पाटील कुटुंबाला बसला. कधीकाळी १०० एकर जमिनीची मालकी असलेले हे कुटुंब आजघडीला पाण्याअभावी वाळून कोळ झालेल्या द्राक्षाच्या बागेकडे हताशपणे पाहत आहे. शेतात पाणी नसल्यामुळे कुटुंबातील सर्वांचे डोळे पाणावलेले आहेत.

बिहारीपूरच्या नामदेव पाटलांना गंगाधर, अशोक, बाबू, व्यंकट, भरत, रमेश अशी मुले झाली. सन १९९५ मध्ये वडील गेल्यानंतर कुटुंबाची सूत्रे वडीलभाऊ असलेल्या गंगाधर पाटलांकडे (५५) आली. सहा भावांत वडिलोपार्जित १०० एकर जमीन होती; परंतु लेंडी प्रकल्पात ५० एकर जमीन गेली. उर्वरित ५० एकर जमीन सहा भावांच्या हिश्श्याला आली. जमीन प्रत्येकाच्या नावे झाली तरी कुटुंब मात्र एकत्रच राहिले. सहा भाऊ, त्यांच्या पत्नी, १० मुली, १२ मुले असे जवळपास ३४ जणांचे कुटुंब. गंगाधररावांसह सर्व भाऊ नॉन मॅट्रिक. या कुटुंबाला पहिला तडाखा १९७२ च्या दुष्काळाचा बसला. या दुष्काळाने शेतीची धूळधाण केल्यामुळे गंगाधर पाटलांसह सर्वांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पुढची पिढी अशिक्षित राहू नये म्हणून मुलांना पुणे, लातूर, नांदेड, शिरूर ताजबंद येथे शिकायला ठेवले; परंतु या वर्षीच्या दुष्काळाने पुन्हा तेच चित्र समोर आणले. १० एकर शेतीत २००५ मध्ये द्राक्षाची बाग लावली.

या बागेवर तार कंपाउंड, द्राक्षांसाठी लोखंडी अँगलचा मांडव यावर ५० लाख रुपये खर्च केला. पहिली चार-पाच वर्षे एकरी दीड लाखाचे उत्पन्न झाले. गेल्या दोन-तीन वर्षांत मात्र अवर्षणाने तडाखा दिला. यंदा तर पूर्ण बागच वाळून काड्या झाली. द्राक्षासह मोसंबीच्या ५ एकर बागेचीही तीच अवस्था झाली. शेतातील दोन्ही बोअरचे पाणी दिवाळीपासूनच आटण्यास सुरुवात झाली. इतरत्र पाण्याची सोय नाही.

शासकीय मदत मिळेना
मुखेड तालुक्यात एकमात्र द्राक्षाची बाग होती. पाण्याअभावी सर्व वाळून गेले. किमान २५ वर्षे द्राक्षाच्या वेलीचे आयुष्य असते. अजून १० वर्षे उत्पन्न आले असते. मात्र, आता काही नाही. आंबा, चिंच आहे. ती झाडे कशीबशी हिरवी आहेत. द्राक्षे, मोसंबी मात्र पूर्ण गेले. अजून तरी शासनाने काही मदत दिली नाही. आमच्या नावावर ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्याने शासकीय मदतही फारशी मिळत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.