आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटांची मालिका : जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सलग दोन वर्षांपासून भीषण जलसंकटाचा सामना करणा-या आणि चार महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा सोसणा-या जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भरपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

हिरवा शालू पांघरणा-या काळ्याभोर जमिनीतून फक्त धूळ उडत आहे. जलस्रोतही दिवसेंदिवस आटत आहेत. ओसंडून वाहणा-या नद्या, नाले कोरडेठाक आहे. यंदा सव्वा महिन्यात केवळ 28 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्याही अडीच टक्क्यांहून पुढे झालेल्या नाहीत. भरपावसाळ्यात 174 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जून महिना कोरडा गेल्याने जिल्हाभरात पाणीटंचाईचे जास्त तीव्रतेने जाणवत आहे. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 11 तालुक्यांतील 35 तलावांमधून पिण्याच्या पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. सध्या 195 टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असून सप्टेंबरअखेरपर्यंत 370 गावांत 504 टँकर धावण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. सध्या 174 गावांमध्ये 195 टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे.

जून महिना कोरडा गेला, जुलै महिन्यात पाऊस पडेल, ही आशाही फोल ठरत आहे. पावसाने ताण दिल्यास सप्टेंबरपर्यंत 11 तालुक्यातील 35 तलावातील पाणी केवळ टँकर भरण्यासाठी वापरले जाणार आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा अन् पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

तालुकानिहाय आरक्षित तलाव असे : बीड तालुका : पाली, भंडारवाडी, भायाळा. गेवराई : गढी, खामगाव, गुळज पाणीपुरवठा योजना, शिंदेवाडी, पिंळा तलाव. वडवणी : उपळी तलाव. शिरूर : मोरजळवाडी, पिपळवंडी तलावड. पाटोदा : भायाळा, धनगर जवळा, महासांगवी तलाव. आष्टी : करंजी, सिना तलाव. अंबाजोगाई : काळवटी, साकुड तलाव. केज : घागरवाडा, देठेवाडी, जिवाजी वाडी तलाव. परळी : कन्हेरवाडी, चांदापूर, मोहा, क-हेवाडी, वान तलाव व विहिरी. धारुर : उपळी, भोगलवाडी, गुनवत्ती, धारुर तलाव. माजलगाव : माजलगाव प्रकल्प, नित्रुड, वांगी तलाव या लहान मोठ्या तलावांमधून सप्टेंबर अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जुलै महिन्यात पाऊस झाला नाही तर टंचाई भीषण रूप धारण करणार आहे.

जिल्ह्याची सद्य:स्थिती
तालुका टॅँकर गाव
बीड 45 51
गेवराई 10 09
वडवणी 00 00
शिरूर 12 08
पाटोदा 11 09
आष्टी 97 81
अंबाजोगाई 00 00
केज 12 11
परळी 01 01
धारूर 05 02
माजलगाव 00 00
सप्टेंबर अखेर
तालुका टॅँकर गाव
बीड 112 102
गेवराई 50 35
वडवणी 15 12
शिरूर 40 25
पाटोदा 48 30
आष्टी 150 110
अंबाजोगाई 07 05
केज 47 22
परळी 09 06
धारूर 14 20
माजलगाव 06 05