आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडयात दुष्काळाची विदारक परिथिती , दुबार पेरणीच्याही आशा मावळल्या,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- अंबड, घनसावंगीत पेरण्याच नाहीत
यावर्षी जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या वेगाने पूर्ण करण्यात आल्या. कृषी विभागाच्या अहवालानुसार जवळपास ९७ टक्के क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या. मात्र, जवळपास दीड महिना पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम अडचणीत सापडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ७० हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने दुबार पेरणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात साधारणपणे ५ लाख ६१ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली जाते. यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने ५ लाख ४५ हजार ५०४ हेक्टरवर पेरणी व लागवड झाली. जिल्ह्यात २२ जूनपर्यंत १३१ मिमी पाऊस झाला. त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन धोक्यात आले. यातील काही शेतकऱ्यांनी मंठा तालुक्यातील काही भागात कोमेजलेल्या सोयाबीनमध्ये नांगर फिरवून दुबार पेरणीसाठी शेती तयार केली. तर अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील बहुतांश भागात खरिपाची पेरणीच झाली नाही. आता ऑगस्टच्या सुरुवातीला जिल्ह्यात पाऊस झाला असला तरी दुबार पेरणीसाठी तो पुरेसा नाही शिवाय अद्याप जिल्ह्यातील बहुतांशी मध्यम आणि लघु प्रकल्प तसेच, नदी-नाले कोरडे असल्याने दुबार पेरणी करणे शक्य नाही.
५८% सरासरी पाऊस
जिल्ह्याची सरासरी ६८८ मिमी आहे. आजपर्यंत ३१४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते मात्र केवळ २१४.०५ नोंद आहे.५८%

नांदेड : जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न
ऑगस्ट महिन्याचा एक आठवडा लोटला. अजून सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झाला नाही. यंदा मृगात चांगला पाऊस झाल्याने पेरण्या आटोपल्या. एकूण ७ लाख २२ हजार खरिपाच्या क्षेत्रापैकी ७ लाख ७ हजार क्षेत्रावर पेरण्या झाल्या. त्यात ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्र सोयाबीन, कापूस या रोख पिकाचे आहे. पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी या वर्षी दुबार पेरणीही नाही. जिल्ह्यात ६ लाख ४९ हजार मोठी, २ लाख छोटी अशी एकूण ८ लाख ५० हजार जनावरे आहेत. त्यांना दरदिवशी ४ हजार ४९८.६७ मे. टन चारा लागतो. ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा सध्या उपलब्ध आहे.

औरंगाबाद : मूग, उडीद करपले; कपाशीला फटका
मराठवाड्यातील अन्य सात जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादेत समाधानकारक (८७.६ टक्के) पाऊस झालेला आहे. त्यामुळे ६ लाख १० हजार ३२२ सरासरी हेक्टरवर (१००.६५ टक्के) खरीप पेरणी पूर्ण होऊ शकली. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ४० हेक्टरवर कपाशी, १ लाख ५२ हजार हेक्टरवर मका, १२ हजार ८८४ हेक्टरवर सोयाबीन, ८ हजार ९४० हेक्टरवर मूग, ३ हजार ६३६ हेक्टरवर उडीद, १८ हजार ३३१ हेक्टरवर तूर, २ हजार हेक्टरवर खरीप ज्वारी पिकांचा समावेश आहे. बी-बियाणे, खतांवर सर्वाधिक खर्च येथे झाला आहे. पण ४५ दिवसांतील पावसाच्या खंडाने पिके करपली आहेत. सर्वाधिक फटका कपाशी, मूग, उडीद आणि मका पिकाला बसला आहे. मूग, उडदाच्या उत्पादनात १०० टक्के व उर्वरित पिकांचे ८० टक्के नुकसान होणार असल्याचे कृषी विभागाने केंद्रिय पथकाला देण्यासाठी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. परिणामी औरंगाबाद जिल्ह्याला ४०० कोटींचे नुकसान सोसावे लागणार असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. दुसरीकडे मुख्य पाण्याचे स्राेत जायकवाडीत अत्यल्प साठा शिल्लक असून विहीर, बोअरवेल, लहान मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत.

लातूर : जिल्ह्यात यावर्षी ना पीक, ना पाणी
भीषण दुष्काळ या शब्दाचा अनुभव घेत असलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी ना पीक आहे ना पाणी. काळेभोर रान आणि कोरडे पडलेले पाणवठे असे चित्र ग्रामीण भागात आहे. सलग तिसऱ्या वर्षी अवर्षणाच्या संकटामुळे शेतकरी कोलमडला असून शहरांतील बाजारपेठाही ओस पडत चालल्या आहेत.

४४ टक्के शेतजमिनीवर पेरणीच झाली नाही. तर ५६ टक्के शेतातील पिके वाळून गेली. भविष्यात पाऊस पडलाच तर किमान रब्बीसाठी तरी शेतजमिनी तयार कण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे ७०० ते ८०० फुटांपर्यंतचे बोअरसुद्धा कोरडे पडताहेत. त्यामुळे लातूर आणि उदगीरसारख्या मोठ्या शहरांना अनुक्रमे उजनी आणि कर्नाटकातून रेल्वेने पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही यश नाही. ईदच्या खरेदीनंतर बाजारपेठेत ग्राहकच फिरकला नाही. केवळ किराणा, भुसार मालाच्या बाजारपेेठेत थोडी लगबग जाणवते.

चारा दुर्मिळ : सध्या सोयाबीनची गुळी हा चारा शिल्लक आहे. कडब्याचा भाव २० रुपये प्रतिपेंडी आहे. सोलापूर जिल्ह्यातील चारा उपलब्ध करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
आंदोलने...निवेदने... राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेने हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी केली आहे. तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे रोज मागण्यांचे निवेदन येत आहेत.
हिंगोली : पिकांची वाढ खुंटली, रोगाचीही लागण
सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पहिल्याच टप्प्यात ७५ टक्क्यांवर पेरण्या झाल्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उर्वरित २५ टक्के पेरण्या खोळंबल्या त्या खोळंबल्याच. त्यानंतर आता १० दिवसांपर्यंत टप्प्याटप्प्याने पेरण्या झाल्या आणि आता त्या ९५ टक्क्यांवर पोहाेचल्या असल्या तरी पावसाअभावी हंगाम अद्यापही संकटातच आहे.
जिल्ह्यातील खरिपाच्या ३ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १३ हजारांवरील पेरण्या शिल्लक आहेत. मात्र, पावसाने महिनाभर दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून रोगाचीही लागण झाली आहे.
परभणी : उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट
जिल्ह्यात २० जूननंतर दीड महिना पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाच्या सर्वच पिकांना मोठा फटका बसणार आहे. उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट राहणार असल्याचे कृषी विभागाने अहवालात नमूद केले आहे. सर्वाधिक उत्पादन घेतले जाणाऱ्या सोयाबीनच्या उत्पादनात तर ६० टक्क्यांपर्यंतची घट होणार आहे. जिल्ह्यात २० जूनपर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी ४ लाख १२ हजार ११३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणीची ही टक्केवारी ७८.९७ टक्के आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना काहीसे जीवदान मिळाले असले तरी उत्पादनात मात्र मोठा फटका बसणार आहे. जिल्ह्याचे कापसाचे क्षेत्र घटत असतानाही यावर्षी एक लाख ५९ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र, पाण्याअभावी वाढीच्या अवस्थेत असलेल्या कापसाला मोठा फटका बसणार आहे. कापसाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होणार आहे. सोयाबीनची पेरणी एक लाख ५७ हजार ५२५ हेक्टर क्षेत्रावर झाली होती; परंतु वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्याने सोयाबीन वाळून जाण्याचे ही प्रकार बहुतांश भागात घडले आहेत.
बीड जिल्ह्यात ‘दुबार’च्या आशा मावळल्या
६९३ गावांवर टंचाईचे संकट
जिल्ह्यातील ७ लाख ७८ हजार ७५४ लोकांना भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून यामध्ये सध्या ६९३ गावांत तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. यामध्ये ३७४ गावे व ३१९ वाड्यांना ५०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर ६२९ गावांची तहान सध्या अधिग्रहित करण्यात आलेल्या ८४२ विहिरींवर भागत आहे.

मागील तीन वर्षांपासून दुष्काळ जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही. यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी पाऊस नाही. परिणामी खरीप हंगाम तर हातचा गेलाच असून आता पाऊस नसल्याने दुबार पेरणीच्याही आशा मावळल्या आहेत. मंगळवारी केंद्राचे दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत.
सततचा कमी पाऊस, गारपीट, दुबार पेरणी, या कारणामुळे बीड जिल्हा मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या संकटात सापडलेला अाहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे चौथ्या वर्षीही दुष्काळाची छाया गडद झाली आहे. तर कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही. दुष्काळातून दुष्काळाकडे अशी या जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली आहे.
मृगाच्या पावसावर जिल्ह्यात ५ लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. परंतु मागील दोन महिन्यांपासून पाऊसच नसल्याने सध्या दोन लाख ३४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या पिकांची मोडणी करावी लागणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यातील दोन लाख १४ हजार हेक्टरवर दुबार पेरणी होणार असून उर्वरित क्षेत्र शेतकरी रब्बीसाठी राखीव ठेवले जाणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने अहवालातून दिला असला तरी अद्याप दुबार पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस नाही. पाऊस नसल्याने दुबार पेरणीच्याही आशा मावळल्या आहेत. मूग, उडीद ही पिके तर हातची गेलीच असून सोयाबीन व कापसाचे निम्म्याने उत्पादन घटणार आहे. दरम्यान, वडवणी वगळता इतर दहा तालुक्यांतील चारा संपला आहे.