आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२ लाख हेक्टरचे वाळवंट, ५०० कोटींची धूळधाण ; जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - रब्बीपाठोपाठ खरिपाचा हंगाम साधत नसल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी ६ लाख शेतकरी कुटुंबे अस्थिर झाली अाहेत. या वर्षी पेरणी केलेल्या सुमारे २ लाख हेक्टरवरील पिकांची पावसाअभावी नासाडी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुमारे ५०० कोटींची धूळधाण झाली आहे.
जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच हंगामी पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे बळीराजाने खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस नसला तरी शेतकऱ्यांना पुढच्या पावसाची आशा होती. त्यामुळे अवघ्या महिनाभरात ५० टक्क्यांवर खरिपाची पेरणी झाली. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, संकरित ज्वारी, बाजरी, पिवळी अादी पिकांची पेरणी झाली. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात पडून गेल्यानंतर वरुणराजाचे आगमन झालेच नाही. त्यामुळे जमिनीवर आलेली पिके करपून गेली. काही भागातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन जगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणीसाठे संपत आल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचा या वेळीही नेम चुकल्याने शेतकरी कुटंुबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. खिशात पैसे नाहीत, कर्जाचा भार वाढत आहे, काम नाही, अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे. ४ वर्षांपासून खरिपापाठोपाठ रब्बी साथ देत नसल्याने चिंता वाढली आहे.

पिके मोडली, पंचनामे नाहीत
जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टरवर पेरणी झाली असली तरी वाळून गेलेली निम्म्याहून अधिक पिके शेतकऱ्यांनी मोडून काढली आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी या पिकांचे पंचनामे करणे आवश्यक होते. मात्र, शासनाकडून आदेश नसल्यामुळे पंचनामे झाले नाहीत.
भीषण
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७६७.५ असून चार वर्षांपासून ५० टक्क्यांच्या पुढे पाऊस सरकत नाही. या वर्षी तर चित्र अधिक भयावह आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ११४ मिलिमीटर म्हणजे १४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची ३१ टक्के सरासरी अपेक्षित होती.
ना चारा ना पाणी, जनावरांचे हाल

जिल्ह्यात गाई, म्हशी, बैल अशी साधारण ७ लाख जनावरे आहेत. सततच्या नापिकीमुळे पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकला नाही. गेल्या रब्बी हंगामात अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे ज्वारीची वैरण मिळाली नाही. जुन्या चाऱ्यावर आतापर्यंत गरज भागली असली तरी आता जनावरांसाठी चाराच उपलब्ध नाही. दुसरीकडे कूपनलिका, विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न पडला आहे.

कसं जगायचं
हनुमंत पाटील,
शेतकरी, भानसगाव
खरीप गेला की रब्बीची आशा करायची, पुन्हा खरिपाच्या आशेवर जगायचं, असं किती दिवस कुढत जगायचं, काहीच कळत नाही. आता कर्जही कुणी देत नाही. पिके गेली, पाणी गेलं, जनावरांकडं बघून जीव कासावीस होत आहे. कसं जगायचं, हीच भीती मनात घर करतेय.
भरपाई कशी मिळणार?
नांगरणी, कुळवणी, बियाणे, खत, मजुरी असा सगळा खर्च गृहीत धरल्यास खरिपातील पिकांच्या पेरणीसाठी एकरी १० हजार म्हणजे हेक्टरी २५ हजार रुपये खर्च येतो. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख ९५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. म्हणजे हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे २ लाख हेक्टरवरील पेरणीचा खर्च सुमारे ५०० कोटींच्या घरात आहे. दरवेळी शासनाकडून नुकसान भरपाईच्या नावाखाली तुटपुंजी मदत जाहीर केली जाते. या वेळी तरी शासनाने खर्चावर आधारित मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
जिल्ह्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची चहुबाजंूनी कोंडी होत आहे. कर्ज, रोजीरोटी, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, अशा कामांसाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. त्यामुळे गेल्या ७ महिन्यांत वैतागलेल्या ८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्येच्या घटना टाळण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

शिरूर, गेवराई, उस्मानाबाद, पाथ्रीला सर्वात कमी पाऊस. आता पथकाच्या भेटीची आस...
या तालुक्यांत कमी बरसला वरूणराजा (पाऊस मिमीमध्ये)
उस्मानाबाद 088
तुळजापूर 103
उमरगा 141
भूम 102
कळंब 092
परंडा 122
वाशी 105
गेवराई 051
पाटोदा 090
आष्टी 119
शिरूर का. 036
केज 090
धारूर 095
परभणी 121
गंगाखेड 116
सोनपेठ 120
पाथ्री 095
मराठवाडा 186