आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑन दी स्पॉट: 12 हजार लिटरचे टँकर संपते केवळ चार मिनिटांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- तालुक्यातील पिंपळा (रुई) या गावाला चार वर्षांपूर्वी जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यातून तीन ते चार वर्षे पाणी मिळाले. मात्र पाऊस कमी झाल्यामुळे कुंडलिका प्रकल्पातील पाणीसाठाही कमी झाल्यामुळे योजनेतील विहीर आटली गावचे पाणी पळाले. अाज अठराशे लाेकसंख्येच्या पिंपळ्याला टँकर येतेे, पण त्याच्या दाेनच खेपा अाहेत.

मुख्य गावात तेराशे तर गहिनीनाथ नगर येथे चारशे लोकवस्ती आहे. भांगे वस्ती, खाडे वस्ती शेतात शंभर ते दीडशे लोक वस्ती करून राहतात. एवढ्या लोकसंख्येच्या गावाला एकच टँकर आहे. त्या टँकरच्या दोन खेपा गावात येतात. सकाळी गावात सायंकाळी गहिनीनाथ नगर या ठिकाणी. तेथूनच गावकऱ्यांना महिलांना पाणी आणावे लागते. १२ हजार लिटरचे टँकर केवळ चार मिनिटांत संपते. लोकांनी पाणी भरण्यासाठी टँकर येते त्या ठिकाणी पाण्याच्या मोठ्या टाक्या ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये पाणी साठवून नंतर जमेल तसे पाणी घरी न्यायचे अशी परिस्थिती आहे. गावच्या सरपंचांनी चार महिन्यांपूर्वी टँकरची एक खेप वाढवून मिळावी यासाठी अर्ज केला होता. परंतु अजून काहीच कार्यवाही नाही. सोन्ना खोट्टा येथील अपर कुंडलिका प्रकल्प गावालगत आहे. परंतु तळ्यातच नाही तर गावात कुठून येणार, असे चित्र दिसते.

टोपल्यात लेकरांना अंघोळ : लेकरांनाटोपल्यात अंघोळ घालून ते पाणी कपडे धुण्यासाठी वापरावे लागते. पिण्यासाठी फक्त दोन हंडे दिवसाला मिळतात, असे तारामती उत्तम आंधळे यांनी सांगितले. ज्या दिवशी टँकर येत नाही त्या दिवशी किमीवर असलेल्या सवासेवाडी येथून पाणी आणावे लागते, असे राम मारुती पवार यांनी सांगितले. पिंपळा येथील दुकानदार परमेश्वर मुंडे, मन्नाबी इस्माईल शेख, शांताबाई क्षीरसागर, अाशाबाई शिखरे, गंगुबाई प्रभू आंधळे, बंडू गवळी या ग्रामस्थांनीही पाणीटंचाईमुळे साेसाव्या लागणाऱ्या झळांबाबतची व्यथा व्यक्त केली.

वर्षभरापासून टँकर
>पिंपळा येथे वर्षभरापासून टँकर सुरू आहे. एक खेप वाढविण्याची मागणी आहे. तालुक्यात २० गावांत ४२ खेपा टँकरच्या सुरू आहेत. विहीर बोअर मिळून ६५ ठिकाणी अधिग्रहित केलेले आहेत. प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
-आर. बी. घनघाव,लिपिक, पाणीपुरवठाविभाग, पं. स.

लोक टँकरची देवासारखी वाट बघतात
>पिंपळा येथे दिवसातून टँकरच्या दोन खेपा सुरू आहेत. तीस किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. दिवसाचे अंतर १२० किलोमीटर होते. पाण्याच्या टँकरला एक हजार रुपये भाडे आहे. टाकीचे दोनशे गेले तर आठशे रुपयांत टँकर, मालक आणि चालक येतात.
- नितीन गोपीनाथ राठोड, टँकर चालक

तलावाखालील भागातून पाइपलाइनने पाणी द्यावे
>सोन्नाखोट्टा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातून किंवा तलावाखालील भागातून साडेतीन कि.मी.पाइपलाइनने पाणीपुरवठा केल्यास गावाला पाणी मिळेल. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्याला दीड महिना होऊन गेला. गावातील पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून गावकरी दिवसभर पाण्याच्या प्रतीक्षेत असतात.
-शशिकला रोहिदास गवळी, सरपंच,पिंपळा (रुई), तालुका वडवणी.