जालना - राज्याच्या इतर भागात काही प्रमाणात पाऊस झाला असताना मराठवाडा मात्र अजूनही कोरडा आहे. या भागातील शेतकर्यांना यापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करावा लागला होता, आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या भागात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या जालना जिल्हा दुष्काळ मागणी परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी सदाभाऊ खोत, युवा आघाडीचे रविकांत तुपकर, शिवाजी भोसले, साईनाथ चिन्नदोरे,सुरेश गवळी, सुरेश काळे, लक्ष्मण मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. खासदार शेट्टी म्हणाले मराठवाड्यातील बहुतांश धरणे अद्याप कोरडी आहेत त्यामुळे या भागावर दुष्काळाची छाया असून शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची मागणी ही भीक नाही तर अडचणीत असलेल्या शेतकर्यांसाठी दिलासा देणे सरकारचे काम असल्याचे खासदार शेट्टी म्हणाले. गारपीट मदत वाटपात मोठय़ा प्रमाणात वशिलेबाजी आणि घोटाळे झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. मराठवाड्यावर दुष्काळाची छाया पसरली असताना सरकारने उपाययोजना सुरू कराव्यात व दुष्काळावर शाश्वत उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली.
शेतकर्यांनीही कर्जाला घाबरून आत्महत्या करू नये, बँकेचा किंवा सावकारांचा त्रास होत असेल तर संघटनेशी संपर्क साधावा, प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या जाळा,बँका जाळा मात्र आत्महत्येचा मार्ग निवडू नका असे आवाहन खोत यांनी केले. शेतमालाचे दर वाढल्यानंतर ओरड करणारे सोने, चांदी, सिनेमाची तिकिटे, बिस्कीटे यांचे दर वाढल्यानंतर गप्प का बसतात असा सवाल खोत यांनी याप्रसंगी केला.
पैसे घ्या, मत देऊ नका
पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात असा पुढार्यांचा समज झाला आहे. तो समज खोटा ठरविण्याची वेळ आली आहे असे खोत यांनी सांगितले. निवडणुकीत पैसे वाटणारांनी सत्तेच्या काळात मोठय़ा प्रमाणात पैसा कमविलेला असतो, त्यामुळे ते पैसे वाटतात. शेतकर्यांनी संकोच न करता हे पैसे घ्यावेत, दिवाळी असल्याने मतांचा दर दोन तीन हजार रुपयांपर्यत वाढवा मात्र त्यांना मतदान करू नका असे आवाहन खोत यांनी केले.