परभणी- निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडू लागलेल्या शेतकऱ्यावर प्रशासनाचे सुलतानी संकटदेखील कोसळू लागले आहे. हालअपेष्टांत जीवन जगू लागलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत राज्य सरकारने पाहू नये, त्यांच्याशी चेष्टा करू नये, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा खासदार संजय जाधव यांनी शुक्रवारी (दि. २१) येथे हजारो शेतकऱ्यांसमोर दिला.
परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी खासदार जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती विशद केली. पाण्याच्या प्रश्नावर आधी शेतकरी व त्यांच्या जनावरांसाठी पाणी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. शनिवार बाजार येथून निघालेला मोर्चा नानल पेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शिवाजी पुतळ्याजवळ धडकला. तेथील जाहीर सभेत नेतेमंडळींनी शासन व प्रशासनावर कडाडून टीका केली. आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मीरा रेंगे पाटील, िजल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कच्छवे, कल्याणराव रेंगे पाटील, राम खराबे पाटील आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जायकवाडीचे व लोअर दुधनाचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात, संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून विशेष पॅकेज देण्यात यावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. खासदार जाधव यांनी जिल्हा प्रशासनाने या वेळी प्रामाणिकपणे आणेवारी काढण्याचे काम केल्याबद्दल आभार व्यक्त करताना जिल्ह्यातील संपूर्ण गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्यामुळे शासनाने हा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ करून त्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी करताना शहरातील स्वच्छतेचा, पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच कत्तलखाना हलवण्यात यावा, अशी मागणी केली. उपनेते लक्ष्मण वडले यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे शासन उदासीन असल्याची टीका केली, तर आमदार राहुल पाटील यांनी शासन सोबत नसले, तरी शिवसैनिक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आजच्या या महामोर्चाने शासनाला हा जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यास भाग पाडू, अशी ग्वाही दिली. माजी आमदार मीरा रेंगे, डॉ. दळणर, जिल्हाप्रमुख आणेराव आदींची भाषणे झाली.
पदाधिकाऱ्यांतील संघर्ष हातघाईवर दुष्काळाच्या मागणीसाठी निघालेला मोर्चा शिवाजी पुतळ्याच्या बाजूस आल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. मात्र, मंचावर जाण्याच्या कारणावरून दोन पदाधिकाऱ्यांत चांगलीच जुंपली. कल्याणराव रेंगे, युवा सेनेचे श्रीनिवास रेंगे व पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश ढगे यांच्यात सुरुवातीस शाब्दिक बाचाबाची, नंतर एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत हे प्रकरण गेले. दरम्यान, खासदार संजय जाधव यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. या वादाचे कारण काही वेगळेच असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती.