आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought In Marathwada Water Shortage Issue Dharur

डोंगरकुशीतील सोनीमोहा गावात वर्षभरापासून टँकर; मुलांचीही पाणी भरण्यासाठी हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर -तालुक्यातील सोनीमोहा गावात कधी नव्हे ते या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले अाहेत. गावात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली असून संपूर्ण मे महिना कसा काढायचा, याची चिंता लागली अाहे. गावात पाण्याचे टँकर येताच महिला व पुरुषांची झुंबड उडते. त्या गर्दीतूनही मिळणारे पाणी घागर-दोन घागरच मिळते. पाणी मिळवण्यासाठी मुलेही गुंतले आहेत.
बालाघाटाच्या डोंगरकुशीत सोनीमोहा गाव वसलेले आहे. साडेतीन हजारांच्या जवळपास येथील लोकसंख्या आहे. गावांतर्गत पिंपळदरा वस्ती, गाडवदरा वस्ती, तोंडे वस्ती, मुंडे वस्ती, साठे वस्ती, भोसले वस्ती अशा सहा वस्त्या आहेत. गावात सहा ठिकाणी विंधन विहिरी आहेत. तर पाच ठिकाणी हातपंप बसवण्यात आले आहेत. तसेच मागील सात वर्षापूर्वी येथे जलस्वराज्य योजनेतून विहिरी खोदून नळयोजना करण्यात आली आहे. दरवर्षी येथील विहिरी, विंधन विहिरी, हातपंप यांना पुरेसे पाणी असते. भर उन्हाळ्यातील महिना तेदीड महिना सोडले तर कधीच पाणीटंचाई भासत नाही.

गावात नेहमी ८० टक्क्यांपर्यंत बागायती क्षेत्र असते, परंतु या वर्षी काहीच नाही. सोनीमोहा परिसरात या वर्षी पावसाळ्यात एकदाच हलक्याशा सरी कोसळल्या होत्या. त्या नंतर काहीच पाऊस झाला नाही. त्यामुळे जलस्रोतांना पाणीच आले नाही. यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून येथे टंचाई आहे. मागील दहा महिन्यांपासून येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावात शासकीय टँकरने चार खेपा टाकण्यात येतात. गत महिन्यात येथील ऊसतोड कामगार गावाकडे परतले आहेत. त्यामुळे गाव गजबजले आहे.

ऊसतोड कामगार स्थलांतरित होते तेव्हा टँकरचे पाणी मुबलक वाटायचे. परंतु अाता कामगार परतल्याने पाण्याची टंचाई भासत अाहे. गावाच्या चार बाजूंना टँकर उभे करण्यात येते. प्लास्टिक पाइप टँकरमध्ये टाकून पाण्याचा उपसा केला जातो. पाइप टाकण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असते. दहा मिनिटांत टँकर रिकामे होते. महिला स्वयंपाक किंवा जेवण करत असताना टँकर गावात आल्यास जेवणाचे ताट बाजूला सारून पाणी आणण्यासाठी धावपळ करताना दिसतात.
गावातील पाणीटंचाईचे उग्र रूप पाहून येथील चेअरमन भगवान तोंडे व ग्रामपंचायत सदस्य अंजना आडागळे यांचे पती विष्णू आडागळे यांनी पाण्याच्या टँकरच्या चार खेपा स्वखर्च करून अाणत अाहेत. यामुळे गावातील काहीशी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.

सहा दिवसांना वस्तीवर टँकर
सोनीमोहा गावात पिंपळदरा वस्तीवर पाचशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. येथे पाच ते सहा दिवसांनी टँकर येते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. येथे नियमित टँकरची आवश्यकता आहे.
- प्रदीप तोंडे, ग्रामस्थ, पिंपळदरा वस्ती, सोनीमोहा.

उपळी धरणावरून योजनेची गरज
- गावात अनेक ठिकाणी वस्त्या विखुरल्या आहेत व वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. गावात कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी जवळच असलेल्या उपळी धरणावरून नळ योजना करण्याची गरज आहे.
-सत्यभामा दत्तात्रय तोंडे, सरपंच