आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकट: कष्टाने जगवलेल्या फळबागा डोळ्यासमोरच जळताहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर- दुष्काळाची झळ बसल्याने तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जिथे हंडाभर पिण्याचे पाणी शोधताना जीव मेटाकुटीला येतो तिथे फळबागा कशा जगवायच्या, हा प्रश्न परतूर तालुक्यातील फळबागायतदारांना पडला आहे. पाण्याअभावी या फळबागा डोळ्यासमोर जळून जात असताना केवळ हताशपणे त्याकडे पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय या शेतकऱ्यांकडे नाही.

तालुक्यातील सिंगोना या गावातील अनेक शेतकरी याच विवंचनेत आहेत. परतूर शहरापासून अवघ्या पाच िकलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगोना गावाची लोकसंख्या एक हजार सहाशे इतकी आहे. आज हे संपूर्ण गाव पूर्णपणे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे पाणी पिण्यासाठीही पुरेसे ठरत नाही, त्यातच गावातील सर्व जलस्रोत कोरडे पडल्याने ग्रामस्थांना भटकंतीशिवाय पर्याय नाही. सद्य:स्थितीत गावातील एकमेव कुपनलिकेतून चार ते पाच तासांनंतर केवळ २० लिटर पाणी निघते अन् त्यासाठीही ग्रामस्थांचे नंबर लागलेले असतात. अशातच फळबागा कशा जगवणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. येथील शेतकरी बापूराव बाळाजी सोळंके यांची दहा एकरांवरील एक हजार मोसंबीची झाडे असलेली बाग टंचाईमुळे होरपळून निघाली आहे. त्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केला, पण शेततळे मंजूर झालेच नाही. दहा वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली ही बाग आज करपून जाताना हताशपणे पाहण्याची वेळ बापूराव सोळंकेंवर येऊन ठेपली आहे. एकीकडे दुष्काळ अनुदान वाटपाचे मोठमोठे आकडे शासन जाहीर करत असताना या शेतकऱ्याला मात्र अद्याप एकही रुपया मिळालेला नाही. गावातील बहुतांश शेतकऱ्यांची हीच स्थिती आहे. फळबागांची लागवड करण्यापासून त्यावर मोठा खर्च करावा लागतो. पाच- दहा वर्षे मोठा खर्च करून सांभाळलेल्या बागा आता उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असतानाच वाळत आहेत. त्यामुळे सरकारने दुष्काळातील बागा किमान जगल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

बागा तोडण्यासाठीही खर्च : ज्याशेतातील मोसंबीची झाडे वाळली आहेत ती झाडे तोडून पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करणे आवश्यक आहे. मात्र, वाळलेली ही झाडे तोडण्यासाठीही मोठा खर्च करावा लागत आहे. फळबागांसाठी आतापर्यंत मोठा खर्च केला आहे. त्यात आता नापिकीने उत्पन्न हाती आलेले नसताना बागा तोडण्यासाठीच खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे आहे. पाण्याअभावी परतूर तालुक्यातील सिंगोना येथील मोसंबी बाग वाळून गेली आहे.

खर्च कसा करायचा?
>शेततळेमिळालेअसते तर फळबाग जगवता आली असती. फळबाग करपून जात असल्याने मोठे नुकसान होत आहे. शिवाय जळालेली झाडे काढून रान मोकळे करण्यासाठी आता किमान ५० हजारांचा खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी पैसे कोठून आणायचे हा प्रश्न आहे.
- बापूराव सोळंके, शेतकरी,सिंगोना,परतूर

योग्यती कार्यवाही केली जाईल
>शेतकऱ्यांनीशेततळ्यासाठीप्रस्ताव दाखल केल्यानंतर ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे त्याची तपासणी केली जाते त्यानंतर मंजुरी दिली जाते. याबाबतीत सत्यता पडताळल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
-ए.जी.कांबळे, तालुकाकृषी अधिकारी, परतूर