आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या शोधात स्थलांतर आतापर्यंत १५ कुटुंबांचे स्थलांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर - परतूर शहरापासून २३ किमी अंतरावर माळरानावर असलेल्या परतवाडी तांडा येथे पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असतानाच गावात रोजगार हमीची कामे नसल्याने गावातील आतापर्यंत १५ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. त्यामुळे स्थलांतर थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे.

परतूरपासून २२ किमी अंतरावर असलेल्या परतवाडी गावापासून एक किमी अंतरावर परतवाडी तांडा हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास हजार ५०० आहे. परिसरात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. गावात नळ योजना असली तरी विहिरीला थोडेफार पाणी आल्यास चार दिवसांआड दहा मिनिटे पाणी सोडण्यात येते, हे पाणी ग्रामस्थांना पुरत नसल्याने त्यांना परिसरातील एक ते दीड किमी अंतरावरील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.

गावातील बहुतांश घरे झोपडीची आहेत. येथील ४० टक्के लोक ऊसतोडीसाठी परजिल्ह्यात गेले होते; परंतु गावात आल्यानंतर हाताला काम नसल्याने तसेच पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने १५ कुटुंबांनी गावातून पुणे, नाशिक, मुंबई येथे स्थलांतर केले आहे. गावातील ९० वर्षीय महिला पुनाबाई पांडुरंग राठोड यांना विचारणा केली असता त्यांचा एकुलता एक मुलगा कृष्णा राठोड हा गावात रोजगार नसल्याने कर्नाटक येथे ऊसतोडीसाठी गेला असल्याचे कळाले. गावात पिण्याच्या पाण्याबरोबरच रोजगार हमीच्या कामाचा मोठा प्रश्न आहे. पुनाबाई वयस्कर असल्याने त्यांच्या मुलाने एका व्यक्तीला ३०० रुपये देऊन महिनाभर रोज दोन पाण्याचे हंडे देण्याचा करार केला आहे. अल्प पावसामुळे पीक उत्पादन कमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या हाताला काही काम मिळाले नाही. त्यामुळे कामाच्या शोधात तालुक्याच्या िठकाणी किंवा परजिल्ह्यात ग्रामस्थ जात आहेत. त्यामुळे गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

मागणीनुसार कामे देऊ
ज्या गावांचेप्रस्ताव आले त्या गावांत टप्प्याटप्प्याने टँकर सुरू केले जात आहेत. परतवाडी तांडा येथील गावकऱ्यांच्या मागणीनुसार रोजगार हमी योजनेची कामेही सुरू केली जात आहे. त्याशिवाय टँकर सुरू करण्यासंदर्भात सूचना करण्यात येतील. -विनोदगुंडमवार, तहसीलदार,परतूर
परतवाडी तांडा येथील अनेक घरातील कर्ते पुरुष महिला कामाच्या शोधात गेल्याने अनेक घरांना कुलूप लागले आहे.

प्रस्ताव दिला
गावातीलपाणी प्रश्न सोडविण्यासाठी ३१ मार्च रोजी पंचायत समितीकडे प्रस्ताव देण्यात आला आहे; परंतु अद्याप गावात टँकर सुरू करण्यात आलेला नाही. प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करून टँकर सुरू करावे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती थांबवावी. शांताबाई राठोड, सरपंच