आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, कमी पावसामुळे लाल्याच्या प्रादुर्भावाने कापसाशी धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- लासूर स्टेशन परिसरासह गंगापूर तालुक्यातील हलक्या जमिनीत कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने पांढ-या सोन्याचे वार्षिक गणित बिघडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर मका व ज्वारीची कणसे ही भरली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद झाल्याचे चित्र आहे.
यंदा तालुक्यात जवळपास ६४ हजार १२१ हेक्टर जमिनीत कपाशीची लागवड करण्यात आली. चालू वर्षी फक्त सरासरी ४९ टक्केच पाऊस पडल्याने जास्त किडीचा व अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे लाल्याचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही. एस. हंगे यांनी दिली.
चालू वर्षी उशिरा पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या-लागवडी उशिरा झाल्या. त्यात जेमतेम पावसावरील पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले. रब्बी हंगामाचा पेरा १० हजार ५०० हेक्टरवरच झाला. गहू आणि हरभरा निसर्गाच्या अवकृपेने शेतक-यांच्या हातून गेल्यात जमा आहे अशी खंत हंगे यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली. या वर्षी पावसाचे प्रमाण विविध भागात समप्रमाणात नसल्याने त्याचा फटका कपाशीला बसला आहे. मागील काही वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकरी पांढरे सोने समजल्या जाणा-या कापसाच्या नगदी पिकाकडे वळले आहेत. त्यात रासायनिक खतांचा तुटवडा असूनही जास्तीचे पैसे देऊन खते खरेदी केली. नंतर पावसाने दडी मारली. पिके जाणार असे वाटत असताना पोळ्यादरम्यान झालेल्या कमीअधिक पावसाने पिकांना जीवदान मिळाले. काही भागात मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट आली आहे. कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने हलक्या जमिनीतील कपाशी एक-दोन वेचणीतच संपणार असल्याची खंत चिंचखेडा येथील शेतकरी रावसाहेब डुबे, भगवान पवार, संजय भागवत, हिरालाल कुकलारे, भालचंद डुबे आदींनी व्यक्त केली.
गंगापूर तालुक्यातील लागवडीची सरासरी पिके
>कपाशी-६४ हजार १२१ हेक्टर
>मका १५ हजार ७९० हेक्टर
>बाजरी ४ हजार हेक्टर
>तूर ४ हजार १६१ हेक्टर
>मूग-२५० हेक्टर
>भुईमूग ६१६ हेक्टर.
एकूण ९६ हजार ११९ हेक्टर.
> रब्बीची पिके- १० हजार ५०० हेक्टरवर आहेत.
कपाशीवर प्रार्दुभाव
तालुक्यात यंदा खरिपाची पिके ९६ हजार ११९ हेक्टरवर झाली. त्यापैकी ६४ हजार १२१ हेक्टरवर निव्वळ कपाशीची लागवड झाली आहे. लाल्या हा रोग नाही. या पिकांना मिळणारे कमी पाणी, वातावरणातील बदल तसेच अन्नद्रव्यांची कमतरता आदी कारणांमुळे लाल्याचा प्रादुर्भाव जाणवतो. व्ही.एस. हंगे, तालुका कृषी अधिकारी
व्यवहार ठप्प
कमी पावसामुळे शेतक-यांच्या सर्वच पिकांचे उत्पन्न निम्म्याने घटल्याने शेतक-यांवर अवलंबून असलेले व्यवहार ठप्प झाले आहेत.
सुरेश मोडक,व्यापारी, लासूर स्टेशन