आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...अन् कोरड्या डोळ्यात आभाळ दाटलं!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- कर्जत.... अंबड तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचं गाव. मोसंबीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेलं. इथल्या प्रत्येक शेतकयानं एकर, दोन एकरवर मोसंबी लावलेली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून जिथे पिण्याच्या पाण्यासाठी जीव मेटाकुटीला आला तिथे मोसंबीच्या बागांना पाणी कसं देणार? त्यामुळं मोसंबीच्या बागांचंही सरपण झालं. पोटच्या लेकरासारखा जीव लावलेल्या मोसंबीच्या झाडांवर कुहाड चालवताना विजय कपाटेचं काळीज चरचरलं. पण करपलेली झाडं जशी त्याला खुणावू लागली तशीं त्याच्या हातातली कुहाडदेखील सपासप चालत राहिली.

विजयच्या शेतात मोसंबीची 200 झाडे होती. ही झाडे जगवण्यासाठी काही प्रयत्न केला नाही का, असं विचारलं तेव्हा त्याच्या डोळ्यात आभाळ दाटलं. तो म्हणाला, वडिलांनी 12 वर्षांपूर्वी ही झाडे लावली. या वर्षी कुठे चांगले उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली; तोच हिवाळ्याच्या सुरुवातीला ती सुकायला लागली. काही दिवस टॅँकरने पाणी दिलं; पण खर्च परवडला नाही. मग ते बंद केलं. आणखी महिना-दोन महिने पाणी देता आलं असतं तर लाखभराची कमाई झाली असती...असं सांगताना त्याच्या डोळ्यातून पाऊस ओघळला. जालना जिल्ह्यातलं हे एक प्रातिनिधिक वास्तव. जिल्ह्यातली 970 गावं पाणीटंचाईने अशी होरपळत आहेत.

जालना जिल्ह्यात एकीकडे पिण्याचं पाणी नाही तर दुसया बाजूला जनावरांना चारा नाही, त्यामुळं गावकीची कामंदेखील चालेनाशी झाली, अशा अवस्थेत कर्जतच्या शंभरावर युवकांनी गाव सोडले अन् पडेल ते काम करून चार पैसे मिळवण्याची धडपड सुरू झाली. काही जण बिल्डरांकडे तर काही कारखान्यात कामगार म्हणून कामाला लागले, असं सांगतांना राजीव डोंगरे म्हणाले, इथपर्यंत ठीक आहे.... पण आमच्या गावच्या पोरांचे भोग इथंच थांबले नाहीत. दुर्दैवाचा फेरा कसा असतो बघा म्हणत त्याने राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुला-मुलीच्या शाही विवाहाची आठवण करून दिली. या विवाहाची चित्रफीत जेव्हा टीव्ही चॅनलवर सुरू होती त्या वेळी कर्जतचे काही युवक वाढपी म्हणून काम करताना दिसले. ते बघून तर मी उडालोच.... काळ किती बदललाय बघा, असं सांगताना त्याला भडभडून आलं.

युवकांनी गाव सोडलं तरी संपूर्ण कुटूंबानं घर सोडणं शक्य नव्हतं; पुढच्या हंगामासाठी मशागत करणं, गायी-बैलं जगवणं पण गरजेचं होतंच. म्हणून वडिलधारी मंडळी गावातच थांबली. पण सुखाची झोपदेखील त्यांच्या नशिबी राहिली नाही. कारण इथं तीन पाणीपुरवठा योजना आहेत, पण एकही कामाची नसल्याने टॅँकरच्या पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतोय. ज्या विहिरीतून टँकर भरला जातो तेथे दिवसा भारनियमन असते. त्यामुळे टँकर रात्री कधी 10-11 वाजता येतो तर कधी थेट मध्यरात्री... अन् सुरू होते. साया गावाची एकच पळापळ!!ृ इतक्या कष्टाने जे पाणी मिळते तेसुद्धा अशुद्धच. या पाण्याने अंघोळ केली तरी क्षारांमुळे अंग पांढरेफटक पडते. काही लोक तर हेच पाणी पिण्यासाठीही वापरतात. काही गावकरी स्वत:च्या शेतातील पाणी बैलगाडीतून आणतात, पण रानातल्या विहिरींनी तळ गाठल्याने पोहयात येतं ते मचूळ पाणी.... मात्र टँकरच्या पाण्यापेक्षा बरे म्हणून गावकरी समाधान करून घेतात. मार्च महिन्यात ही अवस्था आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात काय बघायला मिळेल याची कल्पनादेखील करवत नाही.

मेल्यावर मदत देणार का? फळबागा वाचवण्यासाठी अनुदान आणि कर्ज देऊ असे आश्वासन देऊन कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकयांचे डोळे पुसण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र जवळपास 60 टक्के बागा जळाल्या आहेत. संपूर्ण बागा नष्ट झाल्यावर मदत देऊन काय उपयोग? चार महिने अगोदर मदत दिली असती तर शेतकरी कर्जबाजारी झाला नसता अन् मोसंबीच्या बागा जगल्या असत्या. आता पुढील हंगामासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे. आमच्या मरणाची वाट बघू नका, असं राजीव डोंगरे पोटतिडकीनं सांगत होता.


कंपन्यांत मिळतात दुप्पट पैसे : कर्जतमध्ये रोजगार हमीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे गावातील तरुण मुले मोठ्या प्रमाणात गाव सोडून जात आहेत. यातील बहुतांश मुले पुण्यात आहेत तर काही मुंबईला गेली. रोजगार हमीपेक्षा कंपन्यांमध्ये दुप्पट पैसे मिळतात. हे त्यामागचं कारण आहे.

‘दिव्य मराठी’ची दखल- ‘दिव्य मराठी’च्या टीमने कर्जतची पाहणी केल्यानंतर तेथील परिस्थितीची जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांना माहिती दिली. गावात अद्यापही रोहयोचे काम सुरू झाले नाही हे सांगताच त्यांनी अंबडच्या तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि तातडीने रोहयोची कामे सुरू करण्याची सूचना दिली. कोणत्याही गावातील ग्रामस्थांनी कामाची मागणी केल्यानंतर त्याला काम दिले नाही तर तहसीलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी देशपांडे यांनी दिली.

मोसंबी उत्पादक- कर्जाच्या खाईत- मोसंबी आणि सोबतच खरीप-रब्बीचे हंगाम हातातून गेल्याने शेतकयांचं अर्थकारण विसकटलंय. त्यातच बागा तोडण्यासाठी आणि जगवण्यासाठीही कर्जाशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे कर्जतच्या शेतकयांवर कर्जात बुडण्याची वेळ आली आहे.