आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought Shadow : Cattle Sell And Their Space Vacanted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्‍काळाची कहर : पशुधन विकून दावणी रिकाम्या केल्या जात आहेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - पाण्याविना शेती गेली;
शेतीविना चारा गेला....
चा-याविना पशू गेले;
एवढे अनर्थ एका बेफिकिरीने केले.....
या ओळी बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एकंदर टंचाईच्या स्थितीचं चित्रण करण्यास पुरेशा ठरतात. गावच्या बखाडीला कंटाळून जसे स्थलांतर वाढते आहे, तसेच पशुधन विकून दावणी रिकाम्या केल्या जात आहेत. दर शनिवारी इथे गुरांचा बाजार भरतो. आजूबाजूच्या 20 गावांतले लोक येतात. सुरुवातीला शेतक-यांनी जमेल तशी नड भागवली, शेवटी अगदीच रेटंना झालं अन् उदास मनानं एकेक दावण रिकामी होत राहिली. चार महिन्यांत दोन-एक हजार बैल कवडीमोल भावानं विकले गेले. आपल्या विकलेल्या बैलांच्या आठवणीनं व्याकूळ झालेले अंबादास गवांडे म्हणाले, ‘सालभर मरेस्तो राबलो, उसनवारीवरचं खतही पेरलं, पण पाण्यानं खोळंबा केला, तरी चार महिने तग धरली. चार-पाच वेळा तालुक्याला जाऊन कडू घास, कडबा आणून जनावराची पोटं भरली. पुन्यांदा चार जागावर हात पसरलं न् पेरणीपुरतं पैसं जमा केलं. पर औंदाबी तीच रड; मान्सानं पळायचं तरी कुठवर? एक दीस चिरडीला आलो, शनिवारच्या बाजारात 60 हजाराला घेतलेली बैलं तीस हजारातच इकली’..... तलवाड्यातल्या सगळ्याच शेतक-यांची स्थिती कमी-अधिक फरकानं अशीच.


तलवाडा... निझाम राजवटीत येथे निझामाचे स्वतंत्र ठाणे होते, येथून अगदी अडीच कि.मी. अंतरावर गोदावरीचे पात्र आहे, तर जायकवाडी धरणाचा उजवा कालवा गावातूनच गेला आहे. या गावाच्या दोन्ही बाजूंना दोन गावतलाव. त्यापैकी एक धाकला, तर एक मोठा!! तलवाड्याचा जीव कधी कासावीस होऊ न देणारे, इथल्या पोराटोरांना पोहायला शिकवणारे हे दोन्ही तलाव मात्र आता थेंब-थेंब पाण्यासाठी आसुसले आहेत.


तलवाडा परिसरात 24 टक्के म्हणजे चार आणे पाऊस झाल्याची नोंद तहसीलला करण्यात आलीय, हे हेरून पांडुरंग काळे यांना पाऊस-पाण्याचे हाल विचारले तर खिन्नपणे हसत गावरान ढंगात त्यांनी पावसाच्या नोंदीवर विश्लेषण केले, ‘‘म्हणाल, तर कधी तरी चार-आठ दिवसाला पावसाच्या शिपक्यामध्ये फकस्त डांबरी रस्ता तेवढा ओला व्हायचा. माती काही भिजली नाही. मग सांगा.... पानी येणार कुठून?’’ काळेंच्या या प्रश्नाला उत्तर नव्हते. तलवाड्याची लोकसंख्या 16 हजार. इथल्या पुरातन बारवेवर रात्रंदिवस महिला-पुरुष पाणी शेंदत असतात. या बारवेला आता अंगचे पाणी राहिले नाही, असे आसराबाई शिंगणे म्हणाल्या. पाणी व्यवस्थापनातील चुकांमुळे आमच्या गावाने अनेक वर्षं पाणीटंचाईचा सामना केला. परंतु, तेव्हा बारवेला, हापशांना भरपूर पाणी होते. त्यामुळे फारसा त्रास जाणवला नाही. 2008 मध्ये नवीन पाणीपुरवठा योजना झाली. नळाला रोज पाणी येऊ लागले. आम्हाला वाटले, आता भोग संपले... पण कसले काय? पाण्याचे पुनर्भरण होण्याऐवजी अमर्याद उपसा होत राहिला. त्यामुळे यावर्षी कधी नव्हती इतकी वाईट स्थिती झाली आहे, अनिता शिनगारे यांची ही प्रतिक्रिया एकूणच वास्तवावर मार्मिक भाष्य करणारी ठरते. एरव्ही गावभर खेळणारं पाणी हरवलं; अन् तलवाड्याचा चेहरा भकास झाला. वडार समाजाच्या वस्तीवर शंभरावर घरे आहेत. लोकांच्या विहिरी खोदण्याचे काम करणा-या या मंडळींनी पुणे गाठलं. या वर्षात झाला पाऊस तर ते परत येतील, अशी साहेबा कु-हाडे यांना आशा आहे. वडार समाजाप्रमाणेच मुस्लिम व मातंग समाजातील 60 कुटुंबांनी बखाडीला कंटाळून स्थलांतर केलेय. दुष्काळाचा दाह माणसांना आणि जनावरांना होरपळून काढतो आहे. वस्तुत: प्रशासन या ठिकाणी चारा छावणी द्यायला केव्हाही तयार आहे. मात्र, पशुधन जगवण्याची जबाबदारी घ्यायला ना कोणी पुढारी समोर आला, ना कोणत्या संस्थेने पुढाकार घेतला. जो-तो स्थानिक राजकारणात आणि श्रेयाची लढाई लढण्यात मश्गुल आहे.


तीन नद्यांचे वरदान, तरीही दुष्काळाने होरपळ
गावकरी आणि प्रशासनाने आदर्श जलव्यवस्थापन न केल्यामुळेच जून 2012 पासून टंचाईचा सामना करणा-या तलवाड्याची आता अक्षरश: होरपळ होतेय, हे इथलं वास्तव अनुभवताना लक्षात आले. ज्या गंगथडीला पाणीटंचाई हा शब्ददेखील माहीत नव्हता, त्या पट्ट्यातल्या रहिवाशांची सध्या पाण्यासाठी ससेहोलपट सुरू आहे. वस्तुत: बीडला सिंदफणा, बिंदुसरा आणि गोदावरी या प्रमुख नद्यांचे वरदान असतानाही या जिल्ह्यावर दुष्काळ कायम घोंघावत राहतो, हा दैवदुर्विलास म्हणावा की कर्मभोग ?