आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळ्यातच टंचाईच्या झळा; एक महिना संपला तरी पाऊस येईना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळी हंगामात (हंगाम नावालाच, पावसाचा पत्ता नाही) जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. उपलब्ध पाणीस्रोतांचे पाणी गायब झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यातील 74 गावांना 68 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 155 गावांसाठी 232 विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लहरी निसर्गाचा जिल्हावासियांना मोठा फटका बसत आहे. यावर्षी भर उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली नाही. मात्र, शेतकर्‍यांसाठी हा पाऊस कर्दनकाळ ठरला. भर उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यातील विविध भागांत गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने थैमान घातले होते. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यासमोरील संकटांत वाढ झाली आहे. अनेक गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील 65 गावे आणि 9 वाड्यांना एकूण 68 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 155 गावांसाठी 48 विहिरी आणि 184 बोअर अशी 232 अधिग्रहणे करण्यात आली आहेत. ही संख्या 24 जूनपर्यंतची असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुकास्तरावर टँकर सुरू करण्यात यावेत, अधिग्रहण करावेत, यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव दाखल करण्यात येत आहेत.
लोहारा, तुळजापूर तालुका टँकरमुक्त
जिल्ह्यातील लोहारा आणि तुळजापूर हे दोन तालुके टँकरमुक्त झाले आहेत. भूम तालुक्यात 33 तर कळंब तालुक्यात 18 टँकर सुरू आहेत. तुळजापूर तालुक्यात सहा गावांसाठी सात अधिग्रहणे करण्यात आली आहेत.

वादळामुळे संकटात वाढ
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वार्‍यामुळे विद्युत खांब आडवे झालेले आहेत. याची दुरुस्ती कासवगतीने होत आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाण्याचा प्रश्न उग्र बनला आहे.
दुष्काळ पाचवीला
मागास जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. त्यात जिल्ह्याच्या पाचवीला दुष्काळ पुजल्याचे दिसून येते. मागील दोन वर्षांपूर्वी अत्यल्प पावसामुळे जिल्हावासियांचे प्रचंड हाल झाले होते. त्यानंतर यावर्षीही दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस गायब झाल्यामुळे पाण्यावाचून हाल होत आहेत.

पावसाची आस जून महिना संपत आला
तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय पाणीटंचाईचे चटके सहन करणार्‍या नागरिकांना पावसाची आस
लागली आहे.
प्रकल्पांतही ठणठणाट
जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांतही ठणठणाट निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव सीना- कोळेगाव या मोठ्या प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. तर 17 मध्यम प्रकल्पांपैकी 4 मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, चार प्रकल्पांची पातळी जोत्याखाली आहे. तर 9 प्रकल्पांत 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 193 लघु प्रकल्पांपैकी 74 प्रकल्प कोरडे, तर 69 प्रकल्पांची पातळी जोत्याखाली गेली आहे. या प्रकल्पांवर निर्भर असलेल्या गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत.