आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought Situation On Spot Report At Maharashtra,

दुष्काळाच्या झळा \'ऑन स्पॉट\': चिठ्ठी दाखवा अन् घागरभर पाणी मिळवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- दुष्काळाचा सामना करणाऱ्या धारूर तालुक्यातील आसोला गावात चार महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवले जात असून दररोज चार खेपा मंजूर असताना ग्रामस्थांना दोनच खेपा मिळत आहेत. सार्वजनिक विहिरीतून ग्रामपंचायतीकडून माणशी एक घागर चिठ्ठीप्रमाणे पाणी वाटप केले जात आहे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

बालाघाटच्या घाटमाथ्यालगत आसोला गाव असून हे धारूरपासून सात किलोमीटर अंतरावर अाहे. लोकसंख्या चार हजारांच्या जवळपास आहे. गावांतर्गत बोबडे वस्ती, विठ्ठल वस्ती, जामदेव फाटा, गोरे वस्ती अशा चार वस्त्या आहेत. वस्त्यावरील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यंदा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाण्याचे स्रोत आटले आहेत. पाणीपुरवठ्यासाठी गावात असलेल्या विंधन विहिरी सहा हातपंप कोरडे पडले असून चार महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवले जात आहे. टँकरला चार खेपा नेमून दिल्या असताना फक्त दोनच टाकल्या जात आहेत. दोनच खेपांत गावकरी नियोजन करून कसेतरी तहान भागवत आहेत. गावातील सार्वजनिक विहिरीत टँकरचे पाणी सोडल्यानंतर पाणी वाटपासाठी ग्रामस्थांनी दोन व्यक्तींची नियुक्ती केली आहे. माणशी एक घागर याप्रमाणे पाणी देण्यात येते. यासाठी ग्रामपंचायत शिक्का असलेल्या चिठ्ठ्या गावातील नारायण चोले घरोघरी जाऊन वाटप करतात. विहिरीवर थांबून अशोक सोनवणे चिठ्ठीप्रमाणे घागर वाटप करतात. वाटप केलेल्या चिठ्ठ्या एकत्र करून किती पाणी वाटप झाले याचा अंदाज घेण्यात येत आहे. काही ग्रामस्थ विहिरीतून पाणी शेंदून काढतात. विहिरीचे पाणी कमी झाले तर विहिरीत उरतल्याशिवाय पर्याय उरत नाही. २० फूट खोल असलेल्या विहिरीत ३० पायऱ्या बनवणे गरजेचे असताना खडकातील कप्प्यात पाय ठेवून खाली उतरून पाणी काढावे लागत असल्याने ही जीवघेणी कसरत महिलांना करावी लागते. पाणी काढताना तोल जाऊन अनेक जण विहिरीत पडले आहेत. परिस्थितीमुळे आता गावकऱ्यांच्या ते अंगवळणी पडले आहे. पाणी वाटप करणारास एका घागरीसाठी महिन्याला सहा रुपये ग्रामस्थांना मोजावे लागतात. अनेकदा टँकर आल्यास दोन दिवसाला घागरभर पाणी मिळते. गावात दोन दिवसांपासून टँकरच आले नाही त्यामुळे अर्ध्या गावाला पाच दिवसांपासून पाणी मिळाले नाही. सध्या गावात तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

आसोला गावातदोन खेपा नियमित होतात. गावातील सरपंचाने तीन खेपा टाका, नसता टँकर बंद करा, असे सांगितल्यामुळे आम्ही दोन दिवसांपासून टँकर बंद केले आहे. - सुरेश भोसले, टँकरमालक.

चिठ्ठांप्रमाणे माणशीएक घागर नियमित पाणीपुरवठा करण्यात येतो. दोन दिवसांपासून टँकर आले नाही. त्यामुळे चिठ्ठ्या वाटप केल्या नाहीत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार चिठ्ठ्या वाटप करण्यात येतात.
- नारायण चोले, चिठ्ठ्यावाटप करणारा

पाणी खरेदी करण्याची वेळ
गावात दोन दिवसांपासून टँकर आले नाही. त्यामुळे तीन रुपायाला एक घागर याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पैसे देऊनही वेळेवर पाणी मिळत नाही. पाण्यासाठी दिवसभर गावातच थांबावे लागते.
- अविधा अनंत चोले, गृहिणी,आसोला

अंतर दूर असल्याने खेपा कमी
>आसोला येथे शासकीय टँकरच्या चार खेपा मंजूर आहेत. सध्या उपळी धरणावरून पाणी आणावे लागत आहे. धरणाचे अंतर दूर असल्याने चार खेपा होत नाहीत. वस्त्यांसाठी दुसरे टँकर मंजूर केले आहे.
- राजेंद्र सत्त्वधर, विभागप्रमुख,पाणीपुरवठा, पंचायत समिती, धारूर.