आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought Visit: Due To Suicide Team Avoid Visit Farmers

दुष्‍काळाचा दौरा: आत्महत्येमुळे पथकाने भेट टाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी रात्रीच पळशीतील (जि. लातूर) शेतकरी जाफर शेख यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर पथकाने पळशीत जाऊन तेथील परिस्थिती पाहणे आवश्यक होते. मात्र, बावचीला पाच मिनिटांची भेट देऊन पथकाने पळशीतील थांबलेल्या शेतक-यांची भेट न घेता थेट बीड जिल्ह्याची सीमा गाठली. नियोजित पळशीचा दौरा पथकाने टाळल्यामुळे मराठवाड्यातील शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे. हे पथक मराठवाड्याला काय न्याय मिळवून देणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बॅट-यांच्या उजेडात केली ‘बोरगाव काळे’त पाहणी
अनिल पौलकर/ लातूर
केंद्रीय पथकाने सोमवारी सायंकाळी बॅट-यांच्या उजेडात बोरगाव काळे गावात पाहणी केल्यानंतर लातुरात मुक्काम ठोकला. सकाळी निवेदने स्वीकारल्यानंतर पथक बावची आणि पळशी या गावांना भेट देणार होते. मात्र, सोमवारी रात्रीच पळशीतील शेतकरी जाफर शेख यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर पथकाने पळशीत जाऊन तेथील परिस्थिती पाहणे आवश्यक होते. मात्र, बावचीला पाच मिनिटांची भेट देऊन पथकाने पळशीतील थांबलेल्या शेतक-यांची भेट न घेता थेट बीड जिल्ह्याची सीमा गाठली.

लातूर जिल्ह्यात १५ दिवसांत १६ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आलेल्या केंद्रीय पथकाकडून गांभीर्याने पाहणीची अपेक्षा होती. सोमवारी बोरगाव काळे गावात दुपारपासूनच शेतक-यांना बसवून ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात सायंकाळी साडेसात वाजता आलेल्या पथकाने अंधारात दहा मिनिटे संवाद साधला. बॅट-यांच्या उजेडात पिकांची पाहणी केली. त्यानंतर ते लगेचच लातूरच्या विश्रामगृहाकडे रवाना झाले. लोकसभा निवडणुकीत शाही भोजनाचा आस्वाद घेतल्यामुळे तोंड पोळलेल्या जिल्हा प्रशासनाने भाकरी, शेंगा चटणी, पिठलं आणि मेथीची भाजी असा बेत केला होता. जेवण उरकून पथकाने मुक्काम केला. सकाळी आठ वाजताच नाष्टा करून पथकातील अधिका-यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेल्या कामांचे प्रेझेंटेशन पाहिले. आमदार त्र्यंबक भिसे यांनी मागण्यांचे निवेदन दिले. तेवढ्यात कृषी अधिका-यांनी जिल्हाधिका-यांना पथकाची नियोजित भेट असलेल्या पळशी गावात रात्रीच एका शेतक-याने आत्महत्या केल्याची माहिती दिली. ती पथकाला देण्यात आली. त्यावर पथकातील अधिकारी तातडीने शेतक-यांच्या आत्महत्या केलेल्या स्थळाला देऊन माहिती घेतील यासाठी पुढे अधिका-यांना पाठवण्यात आले. नऊ वाजता पथक विश्रामगृहातून निघाले. प्रारंभी रस्त्याच्या कडेला असलेल्या बावची गावात तुरीच्या पिकात जाऊन त्यांनी शेतक-यांना पाणी, फळबागांविषयीची माहिती विचारली. तेथून पुढे पळशीकडे पथक रवाना झाले. मात्र, गावात थांबलेच नाही. मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी येऊन थांबले होते. मात्र, पथकाच्या गाड्या वेगाने बीड जिल्ह्याच्या सीमेकडे निघून गेल्या.

‘‘मुझे गन्ना खाना है, कैसे खाते है ?'
पथकाच्या जेवणासाठी ज्वारीची भाकरी बनवण्यात आली होती. पथक प्रमुख असलेले केंद्रीय कृषी सचिव प्रवेश शर्मा यांना एकट्यालाच ज्वारीविषयी माहिती होती. त्यांनी आपण यापूर्वी खाल्लेली भाकरी वेगळीच होती. एवढी पातळ भाकरी कशी बनवली, अशी माहिती आवर्जुन विचारली. खरी गंमत केली ती पथकातील सदस्या तथा केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या संचालिका वंदना सिंघल यांनी. त्यांना बोरगाव काळे येथे शेतक-याने वाळत असलेला ऊस दाखवल्यानंतर ‘गन्ना ऐसा रहता है क्या' अशी त्यांनी विचारणा केली. ‘कैसे खाते है' असेही विचारले. एवढेच नव्हे, तर ‘मुझे गन्ना खाना है' म्हणत त्यांनी एका अधिका-यामार्फत विश्रामगृहावर ऊसही मागवून घेतला. मंगळवारी सकाळी त्यांनी उसाचे काही कांडके आपल्या बॅगेतून सोबतही नेले.

हा तर निव्वळ फार्स
पथकाची नियोजित भेट असलेल्या गावातच शेतक-याची आत्महत्या झाल्यानंतर खरे तर वास्तव स्थितीचे दर्शन पथकाला घडले असते. मात्र, त्याकडे पाठ फिरवणे हे क्रूरतेचे लक्षण आहे. दोन मिनिटांत पाहणी करून दुष्काळाची मदत देणार असतील तर हा निव्वळ फार्स आहे.
त्र्यंबक भिसे, आमदार, लातूर ग्रामीण

हात जोडले, तुम्हीच आमचे माय-बाप
मालेवाडी (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील शेतकरी निवृत्ती लोमटे व राम लोमटे यांनी केंद्रीय दुष्काळी पथकाचे प्रमुख प्रवेश शर्मा यांच्यासमोर हात जोडून व्यथा मांडत आता सरकारनेच सहारा द्यावा, असे आर्जव केले.
रस्त्यालगतच्याच शेतांची पाहणी
प्रवीण देशपांडे/ परभणी
जिल्ह्यातील सर्वच गावांत दुष्काळी स्थिती असताना केवळ रस्त्यालगतची शेते पाहून केंद्राच्या पथकाने केवळ २० मिनिटांत दोन गावांतील दुष्काळी दौरा आटोपता घेतला. मालेवाडीत (ता.गंगाखेड) डाव्या-उजव्या बाजूची दोन शेते अवघ्या १५ फुटांच्या अंतरावर जाऊन, तर टाकळी कुंभकर्ण (ता.परभणी) येथे शेतक-यांनी अडवल्याने आतमध्ये जाऊन तीन विहिरींची पाहणी या पथकाने केली. ७० फूट खोलपर्यंत गेलेली पाणीपातळी पाहून पथक चक्रावून गेले. शेतक-यांशी संवाद साधताना भाषेचाही अडसर आला.

पथकाचा दौरा दोन तालुक्यांत निश्चित झालेला होता. हे पथक अंबाजोगाई तालुक्यातील सेलूअंबा येथून मालेवाडीत सकाळी अकरा वाजता दाखल होणार होते. प्रत्यक्षात दीड तासाने दुपारी साडेबारा वाजता पथक मालेवाडीत दाखल झाले. पथकाच्या अपेक्षेने शंभरावर शेतकरी सकाळी दहा वाजल्यापासून निश्चित केलेल्या शेतात वाट बघत बसले होते. पथक दाखल झाल्यानंतर निवृत्ती लोमटे व राम लोमटे या शेतक-यांच्या शिवारात पोहोचले. तेथे गणेशसिंह चंदेल, महादेवसिंह परदेशी, श्रीकांत गायकवाड, भानुदास शिंदे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थितीच्या व्यथा मांडल्या. नुकसानीसह शेतक-यांच्या व्यथा ऐकून पथकाचे प्रमुख प्रवेश शर्मा यांनी हिंदी भाषेत " परिस्थिती आमच्या लक्षात आली आहे' असे सांगून "निश्चितच दुष्काळ आहे,' हे मान्य केले.

टाकळीत अडवले
प्रशासनाने टाकळी कुंभकर्ण येथील कुंभारी ते आर्वी रस्त्यावरील अखिल शेख यांचे शेत निश्चित केले होते. त्या शेताची पाहणी केल्यानंतर पथक परत निघाले असता शेतक-यांच्या एका गटाने त्यांना अडवून यापेक्षा भीषण स्थिती असलेल्या कोरडवाहू शेताची पाहणी करण्याची मागणी केली. व्यथा मांडताना प्रत्यक्ष एकरी रोख मदत द्या, तीन हंगाम हातचे गेले आहेत. आता काहीच राहिलेले नाही, अशा शब्दांत शेतक-यांनी दु:स्थिती कथन केली. त्यावर पथकाने अन्य दोन शेतांची पाहणी केली.

विहिरीचा तळ
टाकळी येथील शेतक-यांच्या व्यथा लक्षात घेतल्यानंतर पथकप्रमुख प्रवेश शर्मा यांनी सलग तीन शेतांत असलेल्या विहिरींची पाहणी केली. ७० फुटांपेक्षाही खोल गेलेली पाणीपातळी व विहिरीचा तळ पाहून ते आश्चर्यचकितच झाले.

जनावरांचा प्रश्न गंभीर
यंदा सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांना दुबार व तिबार पेरण्या कराव्या लागल्याने शेतीसाठीचा खर्च वाढला. मात्र, उत्पादनात कमालीची घट झाल्याचेही शेतक-यांनी निदर्शनास आणून दिले. कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न तर गंभीर आहेच, त्याबरोबर चा-याअभावी जनावरांच्याही जगण्याचा प्रश्न आहे.