आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावाकडे जायला बस मिळत नसल्याने मद्यपीने बस पळवली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- गावाकडे जायला बस मिळत नसल्याच्या उद्विग्नतेतून दारूड्याने आपल्या गावाचा फलक असलेली बस पळवण्याचा प्रयत्न मंगळवारी सायंकाळी केला. एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी याबाबत कानावर हात ठेवले असून दुसरीकडे पोलिसांनी मात्र स्वत:च तक्रार देऊन त्या दारूड्यावर गुन्हा नोंदवला.
पुण्यामध्ये संतोष माने या तरुणाने बस पळवून अनेकांना चिरडल्याच्या प्रकारानंतर एसटीने राज्यभर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, लातूर आगाराने त्याची दखल घेतली नसल्याची प्रचिती मंगळवारी सायंकाळी आली. लातूर बसस्थानकातून लातूर ते टाकळी जाणारी बस दोन तासांपासून उभी होती. त्यात खच्चून प्रवासी भरले होते.
मात्र, वाहक आणि चालक नसल्यामुळे गाडी हलायला तयार नव्हती. त्यामुळे प्रवासी खोळंबले होते. त्याच गाडीत बसलेला शाहिद दस्तगीर शेख (रा. टाकळी) याने बसच्या समोरील भागात प्रवेश करून बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. दारू घेतलेली असल्यामुळे त्याचे बरळणे सुरू होते. घाबरलेल्या प्रवाशांनी तातडीने गाडीतून बाहेर धाव घेतली. शाहिद एका खासगी कारवर चालक म्हणून काम करीत असल्यामुळे त्याला वाहन चालवण्याची माहिती होती. त्याने गिअर न्यूट्रल करून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असल्याने त्याला स्टार्टर सापडले नाही. न्यूट्रल झाल्यामुळे गाडीने काही अंतर पार केले. हा प्रकार पाहून एसटीच्या नियंत्रण कक्षातील कर्मचारी आणि बंदोबस्तास असलेले पोलिस धावून आले. एसटी कर्मचाºयांनी आगारप्रमुख युवराज थडकर यांना हा प्रकार कळवला. चौकशीचा सिसेमिरा नको, असे सांगून काहीच झाले नसल्याचा पवित्रा घेण्याचा निरोप कर्मचाºयांना आला. त्यामुळे नियंत्रण कक्षातील कर्मचा-यांनी झाले गेले जाऊ द्या, अशी भूमिका घेतली.
मात्र, प्रवाशांच्या सूचनेनंतर तेथे पोलिस कर्मचारी वालचंद नागरगोजे यांनी शाहिद शेख याच्याविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात स्वत:च
फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.
चौकशी सुरू आहे- मंगळवारी सायंकाळी बसस्थानकात प्रवासी लातूर-टाकळी बसच्या केबिनमध्ये चढला होता. त्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला की नाही याची माहिती नाही. गाडीत जागा पकडण्यासाठी काही लोक चालकाच्या बाजूने गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. कालच्या प्रकाराची चौकशी करूनच वरिष्ठांना कळवले जाईल.- युवराज थडकर, आगारप्रमुख, लातूर