आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑन द स्पॉट: डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त, गावाची तहान आता टँकरवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - मागील दहा वर्षांत डाळिंब उत्पादनात बीड जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या आष्टी तालुक्यातील शिरापूर गावात यंदा दुष्काळाचे संकट ओढावले असून सध्या गावातील डाळिंबाच्या बागा जळाल्याने २०० डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. गावात तीन वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

आष्टी तालुक्यातील शिरापूर गावची लोकसंख्या २१०० इतकी असून गावात २५०० एकर लागवडीखालील क्षेत्र आहे. यंदा सरासरीच्या केवळ दहा टक्के पाऊस झाल्याने ज्वारी, कापूस ही पिकेही अल्प प्रमाणावर आल्याने गुरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असल्याचे तलाठी बापू गव्हाणे यांनी सांगितले. सरपंच सविता भीमराव जिवे म्हणाल्या की, गावात तीव्र पाणीटंचाई असून दररोज टँकरच्या पाच खेपा होत आहेत. धानोरा येथील शिवशंकर सेवा संस्थेच्या जनावरांच्या छावणीला मंजुरी मिळाली आहे. गावात नव्वदीकडे झुकलेले भगवान मुरलीधर दातीर, झुंबरबाई चोरमले, मालनबाई दातीर यांनी आमच्या अनुभवातील ही सर्वात तीव्र पाणीटंचाई असल्याचे सांगितले. शिरापूर गाव मेहेकरी मध्यम प्रकल्पाच्या जवळ असून या धरणाच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांनी मशागत करून शेती उत्पन्न वाढवले होते. बारा वर्षांपूर्वी या प्रकल्पामध्ये पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने या गावातील भास्कर पाटीलबुवा देवकर यांनी २००४ मध्ये ७ एकरवर डाळिंबाची लागवड करत त्यांनी ५५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. हे पाहून या परिसरातील शेतकरीही डाळिंब लागवडीकडे वळाले. गावात ३५० कुटुंबांच्या या गावातील २०० शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड सुरू केली. सुमारे ६० टक्के क्षेत्र डाळिंबाचे झाले. पुढे २००६ मध्ये दिलीप बाळासाहेब देवकर व जयश्री कांतीलाल देवकर यांनी प्रत्येकी ५ एकरावर डाळिंबाची लागवड केली. २००९ मध्ये ३० लाख रुपये, २०१० मध्ये २५ लाख रुपये, तर २०११ मध्ये २० लाख रुपये असे उत्पन्न मिळवले. या गावातील डाळिंब सोलापूर, वाशी, पुणे, नवी मुंबई या ठिकाणच्या बाजारपेठेत जात होते, परंतु तीन ते चार वर्षांपासून कमी पाऊस पडत असल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

कर्जबाजारी होण्याची वेळ
२०१२ मध्ये आम्ही दीड एकरावर डाळिंबाची लागवड केली होती. गेल्या दोन्ही वर्षी बोअरचे पाणी आटल्याने उत्पन्न निघाले नाही. ठिबकसिंचन आणि लागवडीचा ३ लाख रुपये खर्च वाया गेला आहे.
लताबाई जगताप, डाळिंब उत्पादक, शिरापूर

राेजगार हमी योजनेची कामे सुरू करा
पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होत असून वस्तीवरील नागरिकांना टँकरचे पाणी मिळत नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे मंजूर केली नसल्याने मजुरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
-सचिन दातार, प्राध्यापक, शिरापूर
पुढे वाचा... टँकरने ४३ गावांत होते पाणीपुरवठ्याची सोय