आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर - संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. अनेक गावांत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन् मैल भटकंती करावी लागत आहे. अशा स्थितीत परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द या गावाने उत्तम जलनियोजन केल्याने गावाला अद्यापपर्यंत टँकर किंवा विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासलेली नाही. विशेष म्हणजे ग्रामस्थांसाठी पाच रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम ग्रामपंचायतीने सुरू केला आहे. सध्या मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याच्या विक्रीतून अनेक जण लाखोंची उलाढाल करत असताना दैठणा खुर्द ग्रामपंचायतीचा हा उपक्रम दिलासा देणारा ठरत आहे.
परतूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दैठणा खुर्द गावाची लोकसंख्या १९०० आहे. ग्रामपंचायतीने एका खासगी संस्थेच्या सहकार्यातून सुमारे सहा लाख ५० हजार रुपये खर्च करून स्वत:चा वॉटर फिल्टर प्लँट उभारला आहे. याद्वारे पाच रुपयांत २० लिटर पिण्याचे पाणी ना नफा ना तोटा तत्त्वावर पुरवले जाते.

उपक्रम ठरला वरदान
ग्रामपंचायतचा हा उपक्रम दुष्काळात वरदान ठरला आहे. गावातच शुद्ध पाणी तेही माफक खर्चात मिळते. ग्रामस्थही जिल्ह्यातील पाणीटंचाईची जाण ठेवून या पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करत आहोत.
-हरिभाऊ सवने, ग्रामस्थ, दैठणा खुर्द, ता.परतूर.

मूलभूत गरज
पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे ही मूलभूत गरज आहे. यासाठी पंचायत समितीच्या शेष निधीतून पाच लाख रुपये मंजूर करून घेतले व स्वत:चे दीड लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प गावकऱ्यांसाठी सुरू केला आहे.
-संपत टकले, सरपंच, दैठणा खुर्द