आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजनच्या पाइपलाइनमध्ये प्रेशर वाढल्याने स्वारातीत स्फोट, अनर्थ टळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या इमारतीमधील मेडिसीन विभागाच्या वाॅर्ड क्रमांक सतरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या सिलिंडरच्या पाइपलाइनमध्ये प्रेशर वाढल्याने अचानक स्फोट झाला. बुधवारी रात्री बारा वाजता ही घटना घडली. स्फोट होताच २३ रुग्ण वाॅर्डाबाहेर पळाले. डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

स्वाराती रुग्णालयाच्या २३० खाट असलेल्या इमारतीत अतिदक्षता, मेडिसिन विभागाचे महिला व पुरुषांसाठी दोन वाॅर्ड असून लहान मुलांचाही वाॅर्ड याच इमारतीत आहे. मेडिसिन विभागाच्या पुरुष वाॅर्डात रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी पाइपलाइन भिंतीलाच फिट केली असून बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास या पाइपलाइनमध्ये गॅसचे प्रेशर वाढल्याने मोठा स्फोट झाला. वाॅर्डात धुराबरोबर उग्र वास सुटल्याने रुग्ण वाॅर्डाबाहेर पळू लागले. या वाॅर्डाशेजारीच सिलिंडरची स्टॉक रूम असल्याने स्फोटाचे गांभीर्य ओळखून येथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वाॅर्डातील सिलिंडर बाहेर ओढून काढल्यामुळे अनर्थ टळला.

रुग्णांना काढले बाहेर
मेडिसीन विभागाच्या सतरा वाॅर्डांत तेवीस रुग्ण उपचार घेत होते. ऑक्सिजनच्या पाइपलाइनचा स्फोट झाल्यानंतर वाॅर्डातील सर्वच रुग्णांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. रात्रीच्या वेळी रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

लातूरहून खासगी मेकॅनिकला बोलावले
स्वाराती रुग्णालयातील मेडिसीन विभागातील ऑक्सिजनच्या पाइपलाइनमध्ये स्फोट झाल्यानंतर लातूर येथील खासगी मेकॅनिकला स्वारातीत पाचारण करण्यात आले. मेकॅनिकने पाइपची दुरुस्ती करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला.
पाइपमधील गॅस गळतीची तातडीने दुरुस्ती
स्वारातीच्या सतरा क्रमांकाच्या वाॅर्डामध्ये ऑक्सिजनच्या पाइपमध्ये गॅस प्रेशर वाढल्याने स्फोट झाला. या स्फोटात नुकसान जास्त झाले नसले तरी भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी रुग्णालय प्रशासन घेत आहे.
डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, मेडिसीन विभाग, स्वाराती