आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: सामाजिक बहिष्कारामुळे त्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथे बौद्ध समाजावर रस्ता व गायरानच्या कारणावरून काही गावकऱ्यांनी दीड वर्षापासून सामाजिक बहिष्कार टाकला आहे. या लोकांना गिरणी, दुकान, पाणी व रस्ताही बंद करण्यात आल्याने बौद्ध समाजाने अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सामूहिक इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

गारखेड्यात बौद्धांची ९ घरे आहेत. एक कुटुंब सोडले तर कुणालाही शेती नसल्याने काही जणांनी गायरान ताब्यात घेतले. त्यावरून दोन समाजात वाद होता. याच काळात बौद्धवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच एकाने घर बांधले व वाद चिघळला. पाणीपुरवठा, पिठाची गिरणी, किराणा दुकान विशिष्ट समाजाचेच असल्याने बौद्धांना त्यापासून दूर ठेवले जात आहे, असा आरोप निवेदनात केला आहे.

अंगणवाडीत मुलांना पाठवणे बंद : हा सामाजिक बहिष्कार एवढ्यावरच थांबलेला नाही. गावातील अंगणवाडीत शिक्षिका आणि मदतनीस बौद्ध असल्याने विशिष्ट समाजाने मुलांना अंगणवाडीत पाठवणे बंद केले आहे. सांडपाणी बौद्धवाड्याच्या दिशेने सोडण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद आहे. गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांनी गावात पाहणी केली. दरम्यान, बहिष्कार टाकणाऱ्या गावातील लोकांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
चौकशीच्या सूचना
एखाद्या समाजावर बहिष्कार टाकणे गंभीरच आहे. सत्यता पडताळण्यासाठी सेनगावचे तहसीलदार आणि पोलिस विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशी अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- अनिल भंडारी, जिल्हाधिकारी, हिंगोली.
बातम्या आणखी आहेत...