आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इको-फ्रेंडली विसर्जनासाठी पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- ‘दिव्य मराठी’ने केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देत या वर्षी जवळपास साडेचार हजार गणेशभक्तांनी घरात शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. यापैकी सर्वच कुटुंबे आता गणेश विसर्जनही घरातच करणार आहेत. दरम्यान, हजारो गणेशभक्त अाणि सार्वजनिक गणेश मंडळे मोती तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येतात. त्यामुळे तलावाच्या ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन करता यावे यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

जालना शहरात गणेशमूर्तींचे मोती तलावात विसर्जन केले जाते. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने मोती तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. या पाण्यामुळे मोती तलावाच्या खालील बाजूस असलेल्या वसाहतींमधील पाणीपातळीत वाढ होते. त्यामुळे या भागातील अनेक नागरिक बोअरच्या माध्यमातून या पाण्याचा वापर करतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मोती तलावातच गणेश विसर्जन केले जात असल्याने तलावाच्या तळाशी प्लास्टर ऑफ पॅरिसचा मोठा थर साचतो आहे. शिवाय गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगाचाही जलाशयातील जलचरांवर विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे थेट मोती तलावात विसर्जन केले जाऊ नये. म्हणून तलावाच्या परिसरात पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. राज्यातील काही शहरांमध्ये गतवर्षी तलावाच्या शेजारीच कृत्रिम तलाव तयार करून त्यात विसर्जन करण्यात आले होते, तर छोट्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी हौद तयार करण्यात आले होते. त्याच पद्धतीने जालना शहरातही आतापासून पूर्वतयारीची मागणी होत आहे.

हे आहेत पर्याय
मोती तलावाच्या परिसरात मोठा कृत्रिम खड्डा तयार करून त्यात विसर्जन करता येणे शक्य आहे. शिवाय काही स्वयंसेवी संस्था मूर्ती संकलनासाठी पुढे येत आहेत. प्रशासनाने त्यांच्यात समन्वय घडवून अाणला आणि त्यात सहभाग नोंदवल्यास हे काम अधिक व्यापक स्तरावर करणे शक्य होईल.
बातम्या आणखी आहेत...