आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Education News In Marathi, Syllabus, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलेजच्या नव्या 146 अभ्यासक्रमांना राज्य सरकारने दिली मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात नव्याने विकसित होत असलेल्या विद्याशाखा आणि त्यासोबत निर्माण होणा-या रोजगार आणि व्यवसायाच्या संधी लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील अकृषी विद्यापीठांतील 14६ महाविद्यालयांमध्ये नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांना नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात पहिल्यांदाच अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हे नावीन्यपूर्ण असे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर नॅक दर्जा मिळालेल्या राज्यातील दीडशेहून अधिक महाविद्यालयांनी असे अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी दाखवली होती. यासाठीचे प्रस्तावही विद्यापीठांच्या माध्यमातून सादर केले होते. या प्रस्तावाला उच्च शिक्षण विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.

राज्यातील 10 विद्यापीठांतील महाविद्यालयांमध्ये मान्यता देण्यात आलेल्या 146 नवीन अभ्यासक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठातील 2९ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यात फिल्म, अ‍ॅड.व्ही अँड न्यूज मीडिया प्रोडक्शन, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, एन्व्हॉयर्नमेंटल सायन्स, एन.सी.सी., ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
पुणे विद्यापीठाच्या 50 अभ्यासक्रमांना, कोल्हापूर विद्यापीठाच्या 13, गडचिरोली विद्यापीठाच्या 3, सोलापूर विद्यापीठाच्या 3, मराठवाडा विद्यापीठाच्या 13, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या 4, अमरावती विद्यापीठ 11 आणि जळगाव विद्यापीठ 16 अशा एकूण 14६ नव्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

इतर विद्यापीठे पारंपरिकच
146 अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असली तरी मुंबई विद्यापीठ सोडता इतर विद्यापीठाचे सर्व प्रस्ताव बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम. यांचेच आहेत. त्यामुळे मुंबई सोडता इतर विद्यापीठे आजही पारंपरिक शिक्षणाचाच मार्ग चोखाळताना दिसत आहेत.