आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Officer Probing , Impact Of Ignorance Of Poor Quality Of Rice

अंबाजोगाईच्या शिक्षणाधिका-यांची चौकशी, शाळेतील तांदूळ प्रकरणातील दुर्लक्ष भोवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - येथील गोदावरी कुंकुलोळ कन्या शाळेच्या शौचालयाच्या टाकीत शालेय पोषण आहाराचा तांदूळ टाकल्याचे प्रकरण गंभीर असताना त्याकडे दुर्लक्षच केले नाही तर प्रकरण दडपू पाहणारे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्या विभागीय चौकशीचे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. या प्रकरणातील दोषींवर लवकरच कारवाई होणार असल्याचे समजते.


शैक्षणिक क्षेत्रात नावारूपास आलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी शालेय पोषण आहाराचा साडेतेरा क्विंटल तांदूळ आला होता. हा तांदूळ चक्क शाळेच्या शौचालयाच्या टँकमध्ये टाकल्याचा प्रकार सहा एप्रिल रोजी उघडकीस आला. त्यानुसार तहसील प्रशासन आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. नंतर तहसीलदारांनी जिल्हाधिका-यांकडे तर गटशिक्षणाधिका-यानी शिक्षणाधिका-यांकडे अहवाल सादर केला.


या अहवालानंतर शाळेच्या प्रशासनावर कारवाई होणे अपेक्षित असताना केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. यावर ‘दिव्य मराठी’ने सातत्याने आवाज उठवून पाठपुरावा केला. मात्र, शिक्षण विभागाने हेतुत: काहीच कारवाई केली नाही. शालेय पोषण आहाराच्या तांदूळ गैरव्यवहारावर ‘दिव्य मराठी’ने सतत पाठपुरावा करून वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची औरंगाबादचे शिक्षण उपसंचालक सुखदेव डेरे यांनी गंभीर दखल घेतली.
अंबाजोगाईच्या दौ-यात डेरे यांच्यासोबत शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख (माध्यमिक), सुखदेव सानप (प्राथमिक) हेही होते. ‘दिव्य मराठी’च्या बातम्यांचे कात्रण पाहून डेरे यांनी दोन्ही शिक्षणाधिका-यांची कानउघाडणी केली. कर्तव्यात कसूर करून अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आठ दिवसांच्या आत तांदूळ प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने शिक्षण उपसंचालकांनी 27 जून रोजी शिक्षणाधिकारी सानप यांना नोटीस बजावली. तांदूळ प्रकरण संवेदनशील असून तातडीने कारवाई करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करावा, असे सूचित केले. मात्र, नोटिसीलादेखील सानप यांनी उत्तर दिले नाही.


निर्देशांना बगल
गोदावरी कुंकुलोळ कन्या शाळेत शालेय पोषण आहारातील तांदूळ शौचालयाच्या टाकीत टाकल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश उपसंचालकांनी दिले असताना शिक्षणाधिकारी सानप यांनी या निर्देशांनादेखील बगल दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


पदभार काढण्याची शिफारस
शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनी शिक्षकांच्या बदल्या, अंबाजोगाईच्या कुंकुलोळ शाळेतील तांदूळ प्रकरणावर पडदा टाकणे ही कामे केल्याने शिक्षण विभाग बदनाम होत आहे. सानप हे बेजबाबदार, अकार्यक्षम अधिकारी असल्याने त्यांच्याकडील पदभार काढून अन्य अधिका-यांकडे सोपवावा, असा अहवाल शिक्षण संचालकांकडे (पुणे) पाठवला आहे.
सुखदेव डेरे, शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद.


कठोर कारवाई करावी
पोषण आहाराचा तांदूळ शौचालयाच्या टाकीत मिसळण्याच्या गंभीर प्रकरणात दुर्लक्ष करून ते दडपू पाहणारे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्यावर कठोर कारवाई करावी.
सुभाष महिंद्रकर, सामाजिक कार्यकर्ते