आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडाक्याच्या थंडीत चिमुकल्यांचा शैक्षणिक छळ, शिक्षण विभाग गप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- हाडे गोठवणाऱ्या थंडीत पहिली ते चौथीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी सात वाजता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना सकाळी सहा वाजता उठून तयार व्हावे लागत आहे. पुरेशी झोप न होण्यामुळे त्यांचे शाळेच्या अभ्यासातही लक्ष लागत नाही. पालकांनी शाळांकडे तक्रारी केल्या असल्या तरी त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.
  
जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. पहाटेचे तापमान १२ ते १४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ऊन पडेपर्यंत अंथरुणातच लोळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु या कडाक्याच्या थंडीतही पहिली ते चौथी या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या मुलांना मात्र पहाटे सहा वाजता उठावे लागत आहे. त्यांची शाळा सकाळी सात वाजता असल्यामुळे त्यांना सहा वाजता उठून तयार व्हावे लागते. ज्यांना बस, व्हॅन किंवा ऑटोने जावे लागते त्यांना तर सकाळी साडेसहा वाजताच घर सोडावे लागते. दुसरीकडे पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा मात्र ११ वाजता भरते. त्यामुळे चौथीपर्यंतच्या चिमुकल्यांपेक्षा थोडेसे मोठेपण असलेल्या या मुलांना मात्र उशिरापर्यंत झोपायला मिळते. परंतु चिमुकल्यांना मात्र शैक्षणिक छळ सहन करावा लागतो आहे. मुले साधारण रात्री दहा वाजेपर्यंत झोपत नाहीत. त्यामुळे सकाळी सहा वाजता उठणे त्यांना जड जाते. 

इंग्रज बरे म्हणायचे  
पहिली ते चौथीची शाळा सकाळी ७ ऐवजी  ९ वाजता असावी. आपल्यापेक्षा इंग्रज बरे होते म्हणायचे. किमान ते उन्हाळ्यात सुट्या द्यायचे. आपण कडाक्याच्या थंडीतही लहानग्यांवर अन्याय करत आहोत, याची कुणालाच जाणीव नाही.  किमान महिनाभर तरी लहान मुलांची थंडीतील शाळा उशिरा करता येणार नाही का? संस्थाचालक आणि शिक्षण विभागाने पालक आणि मुलांचा थंडीत जीव खाणे थांबवावे.
- दीपरत्न निलंगेकर, पालक  

संहिता बनवायला हवी  
माध्यमिक शाळा संहिता अस्तित्वात आहे. मात्र, प्राथमिक शाळेसाठीची संहिता अस्तित्वात नाही. त्यामुळे संस्थाचालक आपल्या मर्जीने शाळेचे वेळापत्रक आखतात आणि पालक-मुलांना त्यावर अंमलबजावणी करावी लागते. संहिता बनवणे हाच कायमस्वरूपी उपाय आहे.  
- दिलीप सहस्रबुद्धे, शिक्षणतज्ज्ञ 
 
तक्रार आली तर दखल घेऊ  
पालकांनी संस्थास्तरावर तक्रारी केल्या असतील. आमच्यापर्यंत तक्रारी आलेल्या नाहीत. आमच्याकडे तक्रारी आल्या तर त्याची दखल घेऊन संबंधित शाळांना आम्ही वेळा बदलण्याची सूचना करू.   
- नजिरोद्दीन शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी
 
 
बातम्या आणखी आहेत...