आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने नाथांच्या पालखीने सर केला खडतर गारमाथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - खांद्यावर भगवी पताका उंचावत टाळ, मृदंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत, संत एकनाथ महाराजांच्या पालखीने वारी मार्गातील सर्वात अवघड मानला जाणारा गारमाथ्याचा टप्पा गुरुवारी सहज पार केला.

बीड जिल्ह्यातील हाटकरवाडी (ता. पाटोदा) येथील गारमाथ्याच्या पाच किलोमीटरच्या डोंगरातून पालखी ओढण्याचा नयनरम्य सोहळा गुरुवारी मराठवाड्यातून आलेल्या हजारो वारकर्‍यांच्या साक्षीने पार पडला. 19 जून रोजी पैठणहून नाथांच्या दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. बुधवार, 25 जून रोजी सायंकाळी हाटकरवाडी येथे दाखल झालेल्या नाथांच्या दिंडीमध्ये आठ ते 10 हजार वारकर्‍यांचा सहभाग होता.

19 दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपुरात पोहोचणार्‍या संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचा सर्वात अवघड प्रवास पाटोदा तालुक्यातील रायमोहा परिसरातून होतो. उंच डोंगरातून हाटकरवाडीच्या अवघड प्रवासाला सुरुवात होते. अतिखडतर मार्ग असलेल्या हटकरवाडीत पालखी दाखल होताच, येथील ग्रामस्थांकडून पालखीचे जंगी स्वागत होते.

येथील गावकरीच डोंगररांगांतून नाथांची पालखी अलगद ओढत पाच किलोमीटरचे अंतर लीलया पार करतात. याप्रसंगी गावाबाहेर गेलेले ग्रामस्थ खास गावात हजर राहतात. पालखी ओढण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे.
हरिनामाचा गजर
पालखी गारमाथ्यावर येताच हाटकरवाडीचे ग्रामस्थ आणि वारकर्‍यांनी हरिमानाचा गजर केला. टाळ-मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले. पालखी ओढण्याचा सोहळा सुरू होताच सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला. हा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी गर्दी झाली.
यंदाही गैरसोय
खडतर पालखी मार्ग सुकर करण्यासाठी प्रशासनाने यंदाही उपाययोजना केली नाही. पालखीबरोबर एकच टँकर असून ते अपुरे पडते. हाटकरवाडीचे तरुण गारमाथ्यावर पालखी ओढतात. मात्र, पुढील प्रवासात वारकर्‍यांना अडचणी येतात.
(फोटो - दिंडीने गारमाथा पार केला तो क्षण. छाया : दिव्य मराठी)