सिल्लोड - देशात महाराष्ट्राला नंबर एक करण्यासाठी पूर्ण बहुमतातील सरकार द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी आज सिल्लोड येथे जाहीर सभेत बोलताना केले. भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ बुधवार, ८ रोजी सिल्लोड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राजस्थानचे खासदार नारायणलाल पचारिया, राष्ट्रीय महामंत्री श्याम जाजू, उमेदवार सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती इद्रिस मुलतानी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलताना शहा पुढे म्हणाले, कधीकाळी अग्रेसर असलेला महाराष्ट्र आज मागे पडला आहे. याला राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरकार जबाबदार असून आघाडी सरकारने ११ लाख कोटींचा भ्रष्टाचार करून राज्याला व जनतेला कंगाल केले आहे. जनतेने त्यांना विकास करण्यासाठी निवडून दिले होते; परंतु स्वार्थापायी ते जनतेला विसरले आहेत. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी भाजपचे पूर्ण बहुमतातील सरकार निवडून द्या. शेतीसाठी वीज, पाणी, रस्ते व युवकांना रोजगार उपलब्ध करून विकास साधण्यात येईल. भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने त्या भयभीत झाल्या आहेत. त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यास या सर्व गोष्टी केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. आजच्या सभेत विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.
छत्रपतींचा विसर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सिल्लोड येथे सभेच्या वेळेपेक्षा तासभर उशिरा पोहोचले. मंचावर येताच त्यांनी भाषणास प्रारंभ केला. सात मिनिटांचे भाषण आटोपल्यावर पदाधि-यांनी सांगितल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.