आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election 2014 Analysis To Jalna Voting Center, News In Marathi

ANALYSIS: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पुढार्‍याच्या गावात भाजपची आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- जालना लोकसभा मतदारसंघातील फुलंब्री तालुक्यात मोदी लाटेचा परिणाम गावागावांत झाल्याचे मतदानाच्या आकडेवाडीवरून दिसून येते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढार्‍यांच्या गावातच भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

फुलंब्री तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची दिग्गज नेतेमंडळी कार्यरत आहे. यामध्ये एकहाती विजय संपादन करणारे नेतेदेखील आहेत. मात्र, मोदी लाटेत या दिग्गजांचे गड ढासळले आहेत. तीन महिन्यांनंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपले गड शाबूत ठेवण्यासाठी या नेत्यांना धडपड करावी लागणार आहे. फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुदाम मते यांच्या बिल्डा गावात काँग्रेसला 557, तर भाजपला 628 मते मिळाली आहेत. बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे व देवगिरी साखर कारखान्याचे संचालक पंडितराव जाधव यांच्या वारेगाव या गावात 36, 37, 38 अशी तीन मतदान केंद्रे होती. या ठिकाणी काँग्रेसला 648, तर भाजपला 954 मते मिळाली. बाबरा गाव काँग्रेसच्या नेहमी पाठीशी असते. मात्र, फुलंब्रीचे सरपंच सुहास शिरसाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाबरा गावाचे समीकरण बदलले आहे. या गावातील काँग्रेसचे खंदे सर्मथक तथा पंचायत समितीचे माजी सभापती कचरू मैद, राष्ट्रवादीचे जितेंद्र जैस्वाल हे आहेत. या गावात तीन मतदान केंद्रे असून या ठिकाणी काँग्रेसला 948, तर भाजपला 1202 मते मिळाली आहेत.

बाजार समितीचे माजी संचालक देविदास गाडेकर यांच्या निधोना या गावी ग्रामपंचायत व सहकारी संस्था गाडेकर यांच्या ताब्यात आहे. तरीही या गावातील दोन मतदान केंद्रांवर काँग्रेसला 509, तर भाजपला 666 मते मिळाली. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष लहू मानकापे यांच्या जातेगाव गावातील दोन केंद्रांवर काँग्रेसला 427, तर भाजपला 676 मते मिळाली. विशेष म्हणजे या गावाला फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीची मदत मिळाली होती. तालुक्यातील गणोरी या गावात चार मतदान केंद्रांवर काँग्रेसला 808, तर भाजपला सर्वाधिक 1631 मते मिळाली. तसेच तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळख असणार्‍या वडोदबाजार येथील पाच मतदान केंद्रांवर काँग्रेसला 1183, तर भाजपला 1395 मते मिळाली आहेत. पीरबावडा हे गाव विद्यमान पंचायत समिती सभापती डॉ. सारंग गाडेकर यांचे असून या गावातील दोन मतदान केंद्रांवर काँग्रेसला 531, तर भाजपला 557 मते मिळाली आहेत. फुलंब्री गावात एकूण 15 मतदान केंद्रे होती. या मतदान केंद्रांवर काँग्रेसला 2756, तर भाजपला सर्वाधिक 4223 मते मिळाली. या गावात देवगिरी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र नागरे, अश्फाक पटेल, अजहर पटेल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन देशमुख आदी दिग्गज नेते मंडळी असताना ते भाजपला रोखू शकले नाहीत हे विशेष.