आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांना उस्मानाबादमध्ये उपोषणाची परवानगी नाकारली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका असल्यामुळे परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलिसांचे
म्हणणे आहे.
भ्रष्टाचार प्रकरणात पी. बी. सावंत आयोगाने डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यामुळे हजारे यांनी डॉ. पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. मात्र, पवारांनी हजारे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हजारे स्वत: उस्मानाबादेत सत्याग्रह आंदोलन करण्यासाठी येणार होते. 14 एप्रिल रोजी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नगरपालिकेसमोरील यशराज लॉन्समध्ये सत्याग्रह करणार होते. अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अ‍ॅड. विजयसिंह माने यांनी पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचे कारण सांगत पोलिसांनी हजारे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारत असल्याचे अ‍ॅड. माने यांना कळवले आहे. त्यामुळे हजारे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.