आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका निवडणुकीतही हवाई प्रचाराचा गावागावात धुरळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - राज्यातील १९२ नगरपालिका आणि २० नगर पंचायतींसाठी चार टप्प्यांत मतदान होत आहे. यात पहिला टप्पा २७ नोव्हेंबरला, तर ८ जानेवारी रोजी शेवटचा टप्पा असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा थेट निधी आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करण्याची संधी या कारणांमुळे या निवडणुकांना मोठे महत्त्व आले आहे. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचारसभांचे नियोजन केले आहे. त्यासाठी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात जावे लागणार असल्याने बहुतांश नेत्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे.

नगरपालिका निवडणुकांचा पहिला टप्पा सर्वात महत्त्वाचा असून यात २७ नोव्हेंबरला २५ जिल्ह्यांतील १६५ नगरपालिकांसाठी मतदान होत आहे. त्यावर सर्वच पक्षांनी जोर दिला आहे. त्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारक प्रचारसभा, प्रचार रॅली आणि काही ठिकाणी कॉर्नर बैठकांसाठीही हजेरी लावत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे या प्रमुख सात नेत्यांवर निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचे नियोजन प्रदेश भाजप कार्यालयाने तयार केले असून त्यानुसारच हे नेते प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या जास्तीत जास्त प्रचारसभा कशा होतील यावर पक्ष काम करत आहे. त्यामुळेच दोघांनी एकाच ठिकाणी प्रचारसभा न घेता वेगवेगळ्या प्रचारसभा घेतल्या, तर पक्षासाठी अधिक उपयुक्त ठरेल या विचारातून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दोघांच्याही वेगवेगळ्या ५२ सभा होत आहे. या नेत्यांशिवाय कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी हवाई प्रवासाला महत्त्व दिले आहे.

जालन्यात दररोज हेलिकॉप्टर : सत्ताधारी भाजपच्या नेत्यांसोबच विरोधी पक्षातील अनेक नेतेही हेलिकॉप्टरचा वापर करताना दिसून येत अाहेत. मंगळवारी एकट्या भोकरदन शहरात तीन हेलिकॉप्टर होते. यात काँग्रेसचे अमित देशमुख व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचा समावेश होता.

असे केले जाते नियोजन
बहुतांश नगरपालिका क्षेत्रात विमानतळ नसल्याने हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. त्यात ग्रामीण भागात दिवसभर हेलिकॉप्टरने प्रवास करून प्रचारसभा घेतल्या जातात. सायंकाळी हेलिकॉप्टर प्रवासाला मर्यादा येतात. त्यामुळे रात्रीच्या सभा विमानतळाजवळ असलेल्या पालिकांसाठी दिला जातो. त्यामुळे दिवसा हेलिकॉप्टर आणि रात्री विमानाचा प्रवास करून अनेक नेत्यांनी धडाका सुरू ठेवला आहे.

अडीच लाखांपर्यंत खर्च
दिवसभरातील २५० मैल परतीच्या प्रवासासाठी जवळपास २ लाख ४५ हजार रुपये खर्च होतो. रात्री मुक्काम होणार असेल तर २० ते ४० हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनुसार या दरात बदल केला जातो. त्याशिवाय इतर दरही आकारले जातात. राजकीय नेत्यांकडून वापरले जाणारे बहुतांश हेलिकॉप्टर हे वैयक्तिक मालकीचे असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक कार्यक्रम असा
राज्यात चार टप्प्यांत या निवडणुका होत आहेत. यात पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबरला २५ जिल्ह्यांतील १६५ पालिकांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे व लातूर जिल्ह्यातील १४ पालिकांसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे, तिसऱ्या टप्प्यात १८ डिसेंबरला औरंगाबाद, नांदेड, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील २२ पालिकांसाठी, तर चौथ्या टप्प्यात ८ जानेवारी २०१७ ला नागपूर आणि गोंदियात मतदान होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...