आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराज्यांतून येणाऱ्या रेल्वेंवर निवडणूक आयोगाची नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना अवैध दारू व पैशाचे वाटप होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व यंत्रणेला दिल्या असून परराज्यातून येणाऱ्या रेल्वेवर निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया निःपक्ष व पारदर्शकपणे पार पडेल, असा आयोगाचा प्रयत्न राहील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी शनिवारी (दि.चार) येथे पत्रकार परिषदेत दिली.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीसह नांदेड, हिंगोली लातूर जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. या वेळी  त्यांच्या समवेत अपर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आदी उपस्थित होते.  

राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ग्रामीण भागातील लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी  महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडीअाे पथके, चेक पोस्ट इत्यादी प्रकारच्या उपाययोजना  केलेल्या आहेत. परभणीत २३ भरारी पथके, २४ चेकपोस्ट, १७ व्हिडीओ पथके व खर्च तपासणीसाठी ११ पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.
   
मराठवाड्यात ४०० गट व ९२० गण असून जिल्हा परिषदेसाठी ४९६७ तर पंचायत समितीसाठी ८०८० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. म्हणजे एका जागेसाठी सरासरी ९ ते १०  नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. 

दक्षता घेण्याच्या सूचना
अवैध दारू व पैशाचे वाटप होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना सर्व यंत्रणेला दिल्या. परराज्यातून येणाऱ्या रेल्वेवर नजर ठेवली जाणार आहे. खासगी हेलिकॉप्टरचीसुद्धा तपासणी केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया निःपक्ष व पारदर्शकपणे पार पडेल, अशी दक्षता घेण्यात येत असून मतदान केंद्राबाहेर उमेदवाराचा गोषवारा प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही सहारिया म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...