बीड - खासगी जीपमधून रायमोहा गावाकडे जाणारी ३५ लाखांची रक्कम शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने पकडली. सोमवारी दुपारी चार वाजता बीडजवळील च-हाटा फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.
बीड शहरातील मोंढा रोडवरील महाराष्ट्र बँकेतून शिरूर तालुक्यातील रायमोहा गावाकडे जीपमधून (एम एच २३ एडी ३९५) ३५ लाख रुपयांची रोकड जीपचालक सुनील लक्ष्मण जाधव हा नेत होता. बीड शहरातून चऱ्हाटा रोडमार्गे जीप रायमोहा गावाकडे जात असताना च-हाटा रोडवर दुपारी चार वाजता निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी ए. ई. कुलकर्णी व पोलिस नाईक शेख जुबेर यांनी जीप अडवून झाडाझडती घेतली. लोखंडी पेटीत पोलिसांना पैसे मिळाले. याची शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर एक पथक चऱ्हाटा फाट्यावर दाखल झाले. पाेलिसांनी रक्कम जप्त करून ती बीड तहसील कार्यालयात आणली.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार बँकांना फक्त दहा लाख रुपयांचीच वाहतूक करता येते. दहा लाखांपेक्षा जास्तीची रक्कम असल्याने आयकर अधिकारी या प्रकरणी चौकशी करून अहवाल देणार असून त्यानंतर रकमेबाबत निर्णय होईल.
आतापर्यंत जप्त केलेल्या रकमा
पोलिस ठाणे चेकपोस्ट जप्त रक्कम
युसूफवडगाव माळेगाव ६ लाख ५० हजार
अंभोरा अंभोरा २ कोटी ९८ लाख
सिरसाळा सोनपेठ ६ लाख रुपये
बीड ग्रामीण राजुरी फाटा १ लाख ९० हजार
बीड ग्रामीण च-हाटा फाटा ३५ लाख