आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या बंदोबस्तासाठी हवे आव्हाड, आबा, दादांनीही खडसेंना टाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालकमंत्री संजय सावकारे यांनीदेखील राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकार्‍यांप्रमाणे भाजपशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. राजकीय दृष्ट्या प्रमुख विरोधक असूनदेखील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या संमतीनेच जिल्ह्यातील विषय हाताळले जात असल्याचे लपून राहिले नाही. पक्षासाठी एकाही स्थानिक पदाधिकार्‍यांशी वैर घेण्यास तयार नसल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावची संघटनात्मक जबाबदारी जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्याची मागणी पक्षात जोर धरत आहे.
सभागृह असो वा राजकीय सभा जितेंद्र आव्हाड नेहमीच एकनाथ खडसेंवर थेट आरोपांच्या फैरी झाडून त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात अनेक वेळा आव्हाडांनी खडसेंना थेट आव्हान दिले. एकनाथ खडसेंनीदेखील त्यांना न्यायालयात खेचण्याची तयारी चालवली होती.
अजित पवारांची नाराजी
यापूर्वीचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी एकनाथ खडसेंशी जुळवून घेतले. दोघांमध्ये असलेल्या स्नेहाच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे जिल्ह्या परिषदेत भाजप-राष्ट्रवादीच्या युतीचा विषयदेखील पुढे आला होता. त्यानंतर पालकमंत्रिपद मिळालेल्या संजय सावकारे यांची भूमिकाही मुळमुळीतच राहिली. नियोजन समितीचे कामकाज, लोकसभेतील पराभव, विधान परिषदेच्या निवडणुकीतील नामुश्की आणि भुसावळ नगरपालिकेत भाजपचा पाठिंबा घेण्याच्या घटनेमुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आबा, दादांनीही खडसेंना टाळले
जिल्ह्यात प्रचाराच्या निमित्ताने प्रचारसभा घेणार्‍या गृहमंत्री आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकनाथ खडसेंवर बोलणे टाळले आहे. एकदाही त्यांनी खडसेंवर आरोप केले नाहीत. खडसेंऐवजी त्यांनी आमदार सुरेश जैन तर कधी नरेंद्र मोदींवर तोफ डागली. या उलट खडसेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’ सारख्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर देखील गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे टाळले होते.

जितेंद्र आव्हाडांचे खडसेंवर लक्ष
पक्षाच्या इतर ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले असले तरी जितेंद्र आव्हाडांनी मात्र एकनाथ खडसेंवर यापूर्वी अनेकवेळा तोंडसुख घेतले आहे. राजकीय सभांमध्ये गुजरातची दंगल आणि एकनाथ खडसे या दोनच विषयांवर ते बोलत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत आव्हाडांना जळगावची जबाबदारी देण्याची मागणी होत आहे.