आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घेतला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी शुक्रवारी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली.
दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नगरपालिकेच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकाल लगेच लागत असल्याने या निकालाचा प्रभाव पुढच्या टप्प्यातील निवडणुकांवर होतो, असे म्हणून निवडणूक आयोगावर टीका केली होती.
याबरोबरच आपण निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले होते, त्याअनुषंगाने निवडणूक आयुक्त सहारिया यांनी आज दिलेल्या माहितीला महत्त्व आहे.

सहारिया म्हणाले की, निवडणूक कालावधीत आतापर्यंत २६ कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातही २० लाख रुपये पकडण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात ३० संवेदनशील मतदान केंद्र असून तेथे आवश्यक ते कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून पुरेसा पोलिस बंदोबस्तही देण्यात आला आहे.
याबरोबरच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडून शपथपत्र घेण्यात आले आहे. त्याचा गोषवारा उमेदवाराने दर्शनी भागात किंवा ठळकपणे त्याची प्रसिद्धी करावी. उमेदवाराने, राजकीय पक्ष किंवा त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब एक महिन्यात निवडणूक आयोगाकडे सादर करावा.
राजकीय पक्षाने दोन महिन्यांत हा खर्च सादर करण्याच बंधन घालण्यात आले आहे. असे न केल्यास उमेदवारावर निवडणूक लढवण्यास बंदी अशी कार्यवाही किंवा राजकीय पक्षाची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही होऊ शकते, असे सहारिया यांनी सांगितले.

या निवडणुकीत आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अवैधपणे बाळगण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. अवैधपणे दारू विक्री व त्याची वाहतूक याच्यावरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याबरोबरच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदारांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी घेतली. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीत राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. निवडणुका निर्भय व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

३८८ नगरसेवकांचे भवितव्य : या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात ३८८ नगरसेवकपदांसाठी व २३
नगराध्यक्ष, नांदेड जिल्ह्यात ७९३ नगरसेवक व ५३ नगराध्यक्षपदासाठी, लातूर जिल्ह्यात ५०१ नगरसेवकपदांसाठी व ३८ जण नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.

आता दुसरा व तिसरा टप्पा
मराठवाडा विभागात पहिल्या टप्प्यातील नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आहेत. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात निवडणुका सुरू आहेत. यामध्ये नांदेडमध्ये नऊ नगर परिषदा व दोन नगरपंचायती अशा ११, लातूर चार व औरंगाबाद चार अशा एकूण १८ नगर परिषदा व व दोन नगरपंचायतींत १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ही माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...