आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण-पालिकेच्या वादात पैठणकर अंधारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - नगरपालिका व महावितरण कंपनीच्या वादामुळे पैठण शहर अंधारात सापडले. नगरपालिकेने चार कोटी थकवल्यामुळे महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला, तर महावितरणने मालमत्ता कर थकवल्यामुळे नगरपालिकेने महावितरणचे कार्यालय सील केले. यामुळे सोमवारी शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. मनसेने या आंदोलनात भर टाकत महापालिकेला कंदील भेट दिले.

नगरपालिकेने पथदिव्यांचे साडेचार कोटी थकवल्याने महावितरण कंपनीने पैठण शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा 3 फेब्रुवारी रोजी बंद केला होता. मात्र, नगरपालिकेने वीज बिल न भरल्याने आता महावितरणने शहरातील पालिकेच्या इतर ठिकाणांचादेखील वीजपुरवठा खंडित केला आहे, तर नगरपालिकेनेही थकीत मालमत्ता करासाठी महावितरण कार्यालयास सील ठोकले आहे. महावितरण व नगरपालिकेच्या या वादात मात्र संपूर्ण पैठण शहरातील वीजपुरवठा बंद होता. महावितरण कंपनीचे नगरपालिकेकडे गेल्या अनेक वर्षापासूनचे साडेचार कोटींचे वीज बिल थकीत आहे.

पालिकेला याबाबत वारंवार सूचना करूनही ही थकबाकी न भरल्याने महावितरणने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. दुसरीकडे मात्र महावितरण कार्यालयाकडे नगरपालिकेचा 98 लाख 50 हजार 534 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे, त्यामुळे नगरपालिकेनेही शहरातील महावितरणचे दोन कार्यालय सील केले. नगरपालिकेचे कार्यालयीन अधिकारी व्यंकट पापलवार यांनी नोटीस बजावून ही कारवाई केली.

या दोन्ही कार्यालयामधील थकीत बिलाच्या वादाचा पैठण शहरातील नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शहरातील पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेला कंदील भेट देऊन गांधीगिरी करण्यात आली. या वेळी योगेश जगताप, विष्णू मिटकर, साईनाथ होरकटे, संतोष जोशी, शहादेव लोहारे यांची उपस्थिती होती.

दरम्यान तहसीलदारांच्या मध्यस्थीने सायंकाळी सहा वाजता महावितरण कार्यालयाचे सील उघडण्यात आल्यानंतर पैठण शहराचा वीजपुरवठा सुरळीत झाला.