आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचे दर पन्नास टक्के कमी करणार - मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शिवसेना, भाजप, रासप, रिपाइं, स्वाभिमानी संघटना अशी पाच जणांची महायुती झालेली आहे. आमची पहिली सभा इचलकरंजीत झाली. टोलमुक्त महाराष्ट्र, शेतकर्‍याच्या विजेचे दर पन्नास टक्के कमी करणार, एलबीटी रद्द करणार असे तीन महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले आहेत. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही हा निर्णय लागू करू, अशी घोषणा भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत केली.
नरेंद्र मोदी व शरद पवार यांची गुप्त भेट झालेली नाही. आम्ही आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत कुठलाच समझोता करणार नाही. खरे तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी हा सरकारचा डोलारा सांभाळायला पाहिजे होता, पण पराभवाच्या भीतीने पवारांनी राज्यसभेची वाट धरली, असे सांगून केंद्राच्या विरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचे मुंडे म्हणाले.
बीडला मराठवाड्याची सभा : येत्या 16 फेब्रुवारीला बीड येथे महायुतीची मराठवाड्याची दुसरी सभा होणार आहे. या सभेत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा सत्कार केला जाणार आहे. यासाठी 4 फेब्रुवारीला परळीत नियोजनासाठी बैठक होणार आहे.
खासदार मुंडे रविवारी जिल्हा दौर्‍यावर असताना वडझरी येथील चहाटपरीवर गेले. टपरीचालक आशाताई अशोक सानप यांनी स्वत:जवळील पाचशे रुपयांची नोट मुंडेंच्या हातावर ठेवली. ते पैसे नरेंद्र मोदी यांना द्यावेत, असे सांगितले. हा किस्सा मुंडेंनी पत्रकार परिषदेत सांगितला. बीडच्या सभेत चहाटपरी चालकांना आमंत्रित करू, असेही मुंडे म्हणाले.
सत्ता येताच आमदार पंडितांच्या कटाची चौकशी करणार
दोन तासांत सुटणारा प्रश्न असतानाही अधिकार्‍यांनी दबावापोटी मुद्दाम पाच दिवस लावले. अँड. लक्ष्मण पवारांच्या आंदोलनास यश येऊ नये म्हणून पंडितांनी हा कट केला. तालुक्यातील रस्ते अत्यंत खराब आहेत. विजेचा पत्ता नाही. बोगस कामे करून पैसे उचलण्याची पंडितांची चढाओढ लागली आहे. काही महिन्यांत युतीचे सरकार येताच यांच्या बोगस कामाची चौकशी सुरू करू, असा इशारा खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला. गेवराई तहसील कार्यालयासमोर पाच दिवसांपासून भाजपचे अँड. लक्ष्मण पवार उपोषणास बसले आहेत. रविवारी खासदार मुंडे यांनी उपोषणस्थळी येऊन पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. वीज कंपनीचे अध्यक्ष अजय मेहता यांच्याशी चर्चा करून रात्रीचे भारनियमन बंद केल्याची घोषणा करून अँड. पवार यांचे उपोषण खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सोडले.
परीक्षा काळात रात्री सात ते दहादरम्यान होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अँड. लक्ष्मण पवार उपोषणास बसले होते.