आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज चोरांवर कारवाई; एप्रिल, मे महिन्यात पकडल्या 1249 वीजचोर्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - महावितरण औरंगाबाद परिमंडळात एप्रिल व मे महिन्यात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवून एक हजार 249 वीजचोर्‍या पकडण्यात आल्या. त्यांच्याकडून 25 लाख 15 हजार रुपयांचा दंडात्मक महसूल वसूल करून 725 जणांवर महावितरण जालना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
औरंगाबाद परिमंडळअंतर्गत औरंगाबाद ग्रामीण व जालना जिल्ह्याचा समावेश होतो. औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 126 अंतर्गत शेजार्‍यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसर्‍या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे तसेच कलम 135 मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. औरंगाबाद ग्रामीण परिमंडळ अंतर्गत एप्रिल व मे महिन्यात वीज चोरांविरुद्ध मोहीम राबवून 664 वीज चोर्‍या पकडल्या. या वीज चोरांवर 27 लाख 7 हजार रुपयांच्या वीज बिलाची आकारणी करून 20 लाख 98 हजार रुपये दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला.
585 वीजचोर्‍या
जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात वीज चोरांविरुद्ध मोहीम राबवून 585 वीज चोर्‍या पकडल्या. या वीज चोरांकडून 41 लाख रुपयांच्या वीज बिलाची आकारणी करून 4.17 लाख रुपयांचा दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला. तसेच जालना जिल्ह्यात 420 वीज चोरांवर महावितरण जालना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या पथकाची कारवाई
औरंगाबाद ग्रामीण मध्ये 305 वीज चोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बी.डी.राठोड, कनिष्ठ अभियंते एम.एच.मुळूक, सहायक दक्षता अधिकारी सागर कायस्थ, एम.डी.कुलकर्णी, उप अभियंता गणेश श्रीखंडे, तंत्रज्ञ आर.बी.धुळे, बी.एल.वावधाने, पी.एल.वानखेडे यांनी सहभाग नोंदविला.
अनधिकृत विजेचा वापर करू नये
वीजचोर्‍या पकडण्याची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करू नये. तसेच आकडे टाकून अनधिकृत विजेचा वापर करू नये. अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर नागरिकांनी करावा.
शंकर शिंदे, मुख्य अभियंता, औरंगाबाद परिमंडळ