आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णेत आढळला तब्बल अकरा लाखांचा गांजा; तपासात 215 किलो गांजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- हरियाणातील पानिपतमधून पूर्णेत गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने दाखल झालेल्या त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून सुरुवातीस ४० किलो, तर पोलिसांच्या अधिक तपासात तब्बल २१५ किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत ११ लाख रुपये असल्याने पोलिसही अवाक् झाले आहेत. दरम्यान, गांजा बाळगणाऱ्या दोन आरोपींना गुरुवारपर्यंतची  (दि. १८) पोलिस कोठडी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.  
 
पूर्णा येथील विजयनगर परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिलकुमार श्रीनफेसिंह तवर (३४), बनतो हरिद्वारी पन्नावार (६०, रा. नामुंडा) पानिपत जिल्ह्याचे आहेत. या आरोपींनी संगनमत करून अमली पदार्थाचा व्यापार करण्यासाठी पूर्णा येथे धाव घेतली. शहरातील शेख अय्युब यांच्या मालकीच्या प्लॉटिंगमध्ये मोकळ्या जागेत थैलीत व कॅरीबॅगमध्ये ४० किलो गांजा आरोपींनी आणला होता. पोलिसांनी तो एक लाख ९५ हजार रुपयांचा माल आरोपींकडून जप्त करून त्याचा पंचनामा केला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक भागोजी चोरमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास केला असता आरोपींनी पाल ठोकून राहत असलेल्या शेतात गांजा पुरल्याचे उघडकीस आले.
 
याठिकाणी पोलिस उपअधीक्षक ए. जी. खान, तपास अधिकारी पांडे यांच्या पथकाने छापा मारून पंचनामा केला असता त्या ठिकाणी खड्ड्यात पुरून ठेवलेला २१५ किलो गांजा आढळून आला. दहा लाख ७५ हजार रुपयांचा हा गांजाही पोलिसांकडून जप्त करण्यात आला.
 
बातम्या आणखी आहेत...