आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Employee Himself Theft Money Of Co Operative Society

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचा-यांनीच लुटली पतसंस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- परभणीतील 28 लाखांच्या बनावट चोरीच्या प्रकाराला महिनाही उलटला नाही तोच सेलूच्या रेणुकामाता मल्टिस्टेट पतसंस्थेतही शुक्रवारी रात्री पडलेला सशस्त्र दरोडाही बनावटच ठरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पतसंस्थेच्याच कर्मचा-यांनी दरोड्याची नाट्यमय आखणी करून कोट्यवधी रुपयांची लूट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतसंस्थेजवळील कर्मचारी राहत असलेल्या खोलीतूनच पोलिसांनी शनिवारी 85 तोळे सोन्याची 13 पाकिटे ताब्यात घेतली आहेत.

अशी घडली घटना : सेलूत जवाहर रस्त्यावरील भारत कॉम्प्लेक्समध्ये अहमदनगर येथील श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा आहे. या शाखेतून शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कर्मचा-यांकडून 16 लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने पळवले. पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक मारुती पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तातडीने शहराची नाकेबंदी केली.

तीन संशयित कर्मचारी ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन कर्मचा-यांचे जबाब नोंदवले. त्यातविसंगती आली. प्रत्येकाने घटनेच्या क्रमात व दरोडेखोरांच्या केलेल्या वर्णनात फरक आल्याने संशयाची सुई कर्मचा-यांकडे वळत होती. या प्रकारात पतसंस्थेच्याच कर्मचा-यांचा हात असू शकतो, असा संशय बळावल्यावरून पोलिसांनी शाखा व्यवस्थापक मारुती पवार, रोखपाल जयदीप खराद, लिपिक संदीप जाधव, कुलदीर उंडे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग देवकर, संचालक अंबर काळे, कायदा सल्लागार अ‍ॅड. नितीन भालेराव यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली.

संभ्रम कायम
याप्रकरणी दरोडा पडला की नाही, येथपासूनचे अनेक प्रश्न अजूनही संभ्रम निर्माण करणारे आहेत. सुरुवातीला दरोड्यात 11 लाख रोख व दोन कोटींचे सोने गेल्याचे सांगण्यात आले. नंतर 16 लाखांची रोकड सांगण्यात आली. हा प्रकार संशयास्पद आहे. पोलिस तपासात आणखी ब-याच गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अडगळीत मिळाले सोने
ताब्यात घेतलेल्या कर्मचा-यांची पोलिसांनी शनिवारी कसून चौकशी केली, त्यातून हा सर्व बनाव असल्याचे लक्षात आले. त्यांनी पतसंस्थेला लागूनच असलेल्या कर्मचारी राहत असलेल्या खोलीतील अडगळीच्या सामानाची पाहणी केल्यानंतर तेथे 843 ग्रॅम वजनाची सोन्याची 13 पाकिटे व बिअरच्या रिकाम्या सहा बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी ते सोने जप्त केले. त्यानंतर रोख रकमेबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.

सट्टेबाजीमुळे कर्जबाजारी
सेलू शाखेतील मनोज घुमरेच्या जबाबातून रोखपाल खराद व इतरांनी आयपीएलमध्ये सट्टेबाजी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर दोन ते अडीच लाख रुपये कर्ज झाल्याचेही पोलिसांना समजले. रोखपाल जयदीप खराद व कर्मचा-यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्या राहत्या खोलीत सोन्याची पाकिटे आढळून आली. यामुळे दरोड्याचा प्रकार योजनाबद्धरीत्या कर्मचा-यांनीच घडवून आणला असल्याचे निष्पन्न झाले.