आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरदनमध्ये ६५० अतिक्रमणे हटवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - शहरातील मुख्य रस्त्यावरील शासकीय जागेवर असलेली अतिक्रमणे काढण्याची सूचना देऊनही ती काढली नसल्याने सोमवारी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्वत: रस्त्यावर उतरून महसूल विभाग, नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संयुक्त मोहीम राबवून १२ मोठ्या इमारतींसह लहान-मोठी ६५० अतिक्रमणे हटवली.

भोकरदन शहरातील बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, जालना रोड, सिल्लोड रोड आदी मुख्य रस्त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. ही अतिक्रमणे सात दिवसांच्या आत स्वत:हून काढून घेण्याबाबत संबंधितांना एसडीएम कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु यावर एकानेही अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे एसडीएम मिश्रा यांनी नगर परिषद, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सोबत घेऊन दोन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने सकाळपासूनच अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ केला.

दिवसभरात १२ पक्क्या इमारतींसह लहान-मोठ्या टपर्‍या हटवून रस्ता मोकळा केला. दुपारी १२ वाजता पावसाची रिमझिम सुरू झाली असता थोडा वेळ ही मोहीम थांबवण्यात आली. मात्र, पाऊस उघडताच पुन्हा अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ झाला. या मोहिमेत एसडीएम मिश्रा यांच्यासह प्रभारी तहसीलदार एस. जी. डोळस, मंडल अधिकारी एस. टी. गारोळे, अविनाश देवकर, मुख्याधिकारी रफिक सय्यद, शामराव दांडगे, वामन आढे, गणेश लेकुरवाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के. पी. मराठे, संजय कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक एन. पी. अंतरप, एल. व्ही. चौधरी, एस. टी. कुरेवाड आदी सहभागी झाले होते.

रस्ता झाला मोकळा
पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक परिसर तसेच मुख्य रस्त्याच्या ५० फूट अंतरामध्ये येणार्‍या पक्क्या बांधकामाच्या आरसीसी इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्सचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.

मोहीम सुरूच राहणार
अतिक्रमणधारकांना सात दिवसांची मुदत देऊनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे ही धडक कारवाई करावी लागली. पक्क्या अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई करून जेसीबीचा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, असा आदेश नगर परिषदेला देण्यात आला आहे. मंगळवारीही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार आहे. - लक्ष्मीनारायण मिश्रा, एसडीएम, भोकरदन
बातम्या आणखी आहेत...