आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय दिवाळखोरीत;भाविकांनी देवीला वाहिलेल्या रकमेतून पगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानने १९८३ मध्ये सुरू केलेले तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय दिवाळखोरीत निघाले आहे. गुणवत्ता ढासळल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून चार वर्षांपासून पूर्ण क्षमतेने प्रवेश झाल्याने उत्पन्न घटले आहे. परिणामी, तुळजाभवानीला भाविकांनी वाहिलेल्या देणगीतून कर्मचाऱ्यांचा पगार सुरू आहे. दुसरीकडे महागाई भत्ता कमी केल्याने संतापलेल्या प्राध्यापकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाविरुद्ध कर्मचारी, असा वाद पेटला आहे.
मंदिर संस्थानने सुरू केलेल्या महािवद्यालयात या वर्षी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी केवळ ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २४० विद्यार्थ्यांची मान्यता असताना चार वर्षांत एकदाही पूर्ण क्षमतेने प्रवेश झाले नाहीत. महाविद्यालयात ११० कर्मचारी असून त्यापैकी ५३ प्राध्यापक आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा ४० लाख रुपये लागतात. मात्र, महाविद्यालयाकडे पैसे नसल्याने मंदिर संस्थानसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. चार वर्षांत मंदिराने पगारासाठी सुमारे आठ कोटी ३९ लाख रुपये महाविद्यालयाला दिले आहेत. भाविकांनी देवीला वाहिलेल्या रकमेतून ही रक्कम देण्यात आली आहे. महाविद्यालयाची स्थिती खराब झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्राध्यापकांचा महागाई भत्ता ७२ वरून २० टक्क्यांवर आणला. या निर्णयाच्या विरोधात ४७ प्राध्यापकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यामुळे प्रशासनाविरुद्ध प्राध्यापक असा वाद वाढला. अरेरावीची भाषा वापरून प्रशासनाने प्राध्यापकांवर दबाव आणला असून याचिका मागे घेण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावत कामचुकार प्राध्यापकांवर कारवाई केली आहे, त्यांना सोडणार नाही. मात्र, न्यायालयात जाण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सहाप्राध्यापक निलंबित : तुळजाभवानीअभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा प्राध्यापकांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कमी वेतनावर राबवण्याच्या संस्थानच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात सुडबुद्धीने निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरचा खर्च कमी करण्यासाठी संस्थानने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ७२ टक्केवरून २० टक्के कपात केली. परिणामी वेतनात ३० टक्के कपात झाली. मंदिरात काम करणाऱ्या शिपायांचे वेतन २० हजार असताना त्याच संस्थानचा अभियांत्रिकी महाविद्यालयात काम करणाऱ्या शिपायाचे वेतन केवळ १२ हजारावर आले आहे. ही मोठी तफावत असल्याने कुटुंबीयांवरचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या निर्णयाच्या विरोधात ४७ कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
६४ विद्यार्थ्यांचा प्रवेश
तुळजाभवानीअभियांत्रिकी महािवद्यालयामध्ये या वर्षी अभ्यासक्रमांसाठी केवळ ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या महािवद्यालयाची गुणवत्ता कमालीची ढासळली असून त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.