आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासरावांच्या चिरंजीव धीरज देशमुख यांचा राजकारण प्रवेश! काँग्रेसकडे तिकिटाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- दिवंगत नेते विलासराव देशमुखांनी ग्रामपंचायतीपासून राजकारणाची कारकीर्द सुरू केली होती. त्यांचे बंधू दिलीपराव बाजार समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आले. तोच कित्ता गिरवत विलासरावांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहेत. लातूर तालुक्यातल्या एकुरगा गटातून त्यांनी काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली आहे.

विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित १९९९ मध्येच राजकारणात प्रवेश करते झाले. प्रारंभी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी प्रवेश केला. २००२ मध्ये महापूर गटातून जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, तेव्हा विलासरावांनी पुत्र अमित यांच्याऐवजी मित्र बी. व्ही. काळे यांना पसंती दिली. पुढे अमित यांनी २००९ मध्ये थेट आमदार म्हणूनच सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. पृथ्वीराज चव्हाणांच्या शेवटच्या तीन महिन्यांत त्यांना राज्यमंत्रिपदही मिळाले. विलासरावांचे दुसरे चिरंजीव रितेश हे चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांना स्थानिक राजकारणात सध्या तरी रस नाही. मात्र, कनिष्ठ चिरंजीव धीरज यांनी गेल्या काही वर्षांत हळूहळू भावाच्या नेतृत्वाखाली राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. कुठल्याच पदावर नसताना ते एखाद्या कार्यक्रमात दिसायचे. मंचावर कधी वडिलांच्या, कधी काकांच्या, तर कधी बंधू अमित यांच्या शेजारच्या खुर्च्यांवर दिसायचे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर युवक काँग्रेसच्या लातूर लोकसभा प्रमुखपदी त्यांची निवड झाली.

मोजक्या तरुण कार्यकर्त्यांच्या गराड्यात, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास त्यांनी प्रारंभ केला. गेल्या लोकसभेत त्यांनी प्रचारसभाही घेतल्या. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी लातूर ग्रामीणमधून त्यांना तिकीट देण्याची मागणी केली. शेवटच्या दिवसापर्यंत त्यासाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, प्रदेश पातळीवर शेजारच्या दोन मतदारसंघांतून एकाच घरातील दोघा भावांना कशी उमेदवारी द्यायची यावर खल झाला आणि त्यांचे नाव मागे पडले.  

धीरज यांचे संपर्क दौरे  
धीरज देशमुख यांचे नाव चर्चेत यायला सुरू झाल्यानंतर गेले आठ दिवस ते लातूरमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी एकुरगा परिसरातल्या गावांमध्ये संपर्क दौरेही केले आहेत. मात्र, अद्यापही त्यांनी लोकांसमोर किंवा माध्यमांसमोर आपण इच्छुक असल्याचा दावा केलेला नाही.  

जिल्हा परिषदेतून एंट्री  
या वेळी जि.प.चे अध्यक्षपद खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे बहुमत आले तर अध्यक्ष होता येईल आणि आलेच नाही तर विरोधी गटनेता होता येईल या धोरणातून धीरज देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. लातूर तालुक्यातल्या एकुरगा गटातून धीरज देशमुखांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडे रीतसर मागणी अर्ज सादर करून तिकिटाची मागणी केली आहे. काका दिलीपराव, बंधू अमित यांनीही यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. काँग्रेसची ताकद या गटात आहे. आजवर पडद्यामागे काम करणारे, मीडियापासून चार हात लांब राहणारे धीरज थेट जिल्हा परिषदेतून सक्रिय राजकारणात येत आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...