आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याने 35 फूट उंच बोरीच्या झाडावर केली गणरायाची स्थापना, 'झाडे जगवा'चा संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे. त्यातच दुष्काळही पाठ सोडायला तयार नाही. झाडे जगवा, निसर्ग वाचवा असा संदेश देत  केज येथील एका शेतकऱ्याने शेतातील ३५ फूट उंच बोरीच्या झाडावर केवळ दोन हजार रुपये खर्चात  गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. एकाच वेळी नऊ जणांना झाडावर बसून गणपती पूजा करता येईल,  अशीही व्यवस्था केली आहे.  यंदाचे हे पहिलेच वर्ष असून प्रत्येक वर्षी याच पत्द्धतीने गणपती बसवण्याचा संकल्प  शेतकऱ्याने केला अाहे.   

गणेशोत्सव कालपरत्वे बदलत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडा, डॉल्बी वाजवू नका असे, आवाहन प्रशासनाला करावे लागते. परंतु केज येथील शेतकरी बन्सी मुंडे यांनी त्यांच्या धारूर रोडवरील शेतात नदीच्या कडेला असलेल्या ३५ फूट उंच बोरीच्या झाडावर गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. त्याने झाडावर लोखंडी पलंग तारांनी बांधला. उपयोगात नसलेले बॅनर लावून  पावसासाठी निवारा केला.  झाडावर गणेशभक्तांना  आरतीला जाण्यासाठी लाकडी फळ्यांचा जिना केला. खताच्या पांढऱ्या गोण्यांवर मोरया असे लिहिण्याबरोबरच  झाडे लावा, झाडे जगवा, एक मूल एक झाड ‘मुलाप्रमाणे झाडाचे संगोपन करा’ अशी घोषवाक्ये लिहिली. बोरीच्या झाडावर वेलींनी हिरवेगार अाच्छादन केले आहे.  शेतात हिरवागार  उसाचा फड, गर्द  झाडी असून या ठिकाणी संथपणे  नदी  वाहत आहे.

कशासाठी बसवला गणपती ?  
मागील चार वर्षांपासून  पाऊस कमी झाल्याने  याचा फटका शेतीला बसत असून  केवळ निसर्गाचा समतोल बिघडल्याने कोरडा दुष्काळ ओढवत  अाहे. याला बेसुमार वृक्षतोड हेच प्रमुख कारण आहे. म्हणून वृक्ष संवर्धन व्हावे, शेतकऱ्यांनी झाडे लावावीत , ती जगवावीत म्हणून झाडावर गणपतीची प्रतिष्ठापना  केली आहे.

वृक्षारोपणासाठी शासनाने झाडे द्यावीत 
शासन स्तरावर वृक्ष लागवडीची मोहीम राबवली जाते. शासकीय अधिकारी, कर्मचारी रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून वृक्षारोपण करतात. फोटो काढेपर्यंत त्याकडे लक्ष दिले जाते. मात्र त्यातील अर्धी  झाडे जगत नाहीत. शेतकऱ्यांना विविध फळांची रोपे मोफत उपलब्ध करून दिली तर ते त्याचे संगोपन  करतील.  त्यासाठी आम्हालाच झाडे उपलब्ध करून द्यावीत.  
- विलास मुंडे ,शेतकरी, केज. 
बातम्या आणखी आहेत...