बीड - सामान्य लोकांचं हित केवळ गोपीनाथ मुंडे जपू शकतात, हे ओळखून केंद्रात त्यांच्यावर ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जबाबदारी दिली होती; परंतु ईश्वराला त्यांची गरज जास्त भासली असावी. ते माझे लहान बंधू होते. त्यांची साथ महत्त्वाची होती. ते
आपल्यातून निघून गेले; परंतु इथला बच्चा बच्चा गोपीनाथ मुंडे आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी बीडमधील प्रचारसभेत काढले.
शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी पंतप्रधानांचे मंचावर आगमन झाले. भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. ३१ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव तसेच राज्य, देशातील वंचित घटकांसाठी मुंडेंची गरज प्रतिपादन केली. गोपीनाथजी आणि माझे तीस वर्षे घनिष्ठ संबंध होते. आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
ते म्हणाले, पंधरा वर्षांपासून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हाती तुम्ही सत्ता दिली. मुख्यमंत्री बदलत गेले; परंतु सामान्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. सामान्यांना लुटणाऱ्यांपासून राज्य मुक्त करावयाचे आहे. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत द्या. सामान्यांचे स्वप्न पूर्ण करणारे सरकार स्थापन करा, असे आवाहन मोदी यांनी या वेळी केले.
शहरातील वीजपुरवठा खंडित
सभा सुरू होताच शहरातील सुभाष रोडसह अन्य भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दूरचित्रवाणीकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना मोदींचे भाषण ऐकता आले नाही. शहरातील धानोरा रोडवर असलेले हे विस्तीर्ण मैदान सुमारे एक लाख चौरस मीटर एवढे आहे. दोन लाख नागरिक सभेला बसू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. सभास्थळ गर्दीने फुलले होते.