आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यात एसटीमध्ये स्फोट; 19 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील नळेगावात एसटी बसमध्ये शुक्रवारी शक्तिशाली स्फोट झाला. यात 19 जण जखमी झाले. त्यातील दोन महिलांचे पाय निकामी झाले आहेत. स्फोट कशामुळे झाला हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.


दरम्यान, घटनास्थळाला दहशतवाद विरोधी पथकाने भेट दिली असून, एटीएस महानिरीक्षक संजय लाटकर व पालकमंत्री सतेज पाटील शनिवारी लातुरात येणार आहेत.


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रात्री 7.45 वाजता उदगीर-लातूर (एमएच-20, डी-9253) बस नळेगावात आली. नियंत्रण कक्षात नोंदणीसाठी चालक देविदास मिरकले (रा.लातूर) गाडी बंद करून खाली उतरले. त्यापाठोपाठ गाडीच्या समोरच्या भागात जोरदार स्फोट झाला. तीव्रता मोठी असल्यामुळे स्फोटाचा आवाजही दूरवर गेला. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. किरकोळ जखमींवर नळेगावातच उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी येण्यास पोलिसांनी उशीर केल्याने संतप्त जमावाने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.
संभ्रम कायम : पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला हिमायत बेग उदगीरचा आहे. त्यामुळे उदगीरहून आलेल्या हा बॉम्बस्फोटच आहे, असे लोक म्हणत होते. मात्र, नांदेडहून बोलावण्यात आलेले बॉम्बशोधक पथक आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


जखमींमध्ये महिला वाहकाचाही समावेश : या स्फोटात महिला वाहक पी. आर. सूर्यवंशी जखमी झाल्या. इतर जखमींची नावे अशी- संगमेश्वर मुळे (30, उदगीर), चुन्नीलाल प्रजापती (45, सुरत), नीलाबाई भताने (35, रायवाडी), चबरू महंमदअली हानिफ (48, औसा), शोभा भताने (36, रायवाडी), सत्यशीला गायकवाड (48), एकनाथ सोनकांबळे (67), सुनील लोकरे (50, तिघे रा. उदगीर), रुक्मिणी तेलंगे (48, जगळपूर), बकुळा तेलंगे (50, गांजूर), शिवराम तेलंगे (48, दोघे रा. गांजूर), जयश्री ढाले (50, लातूर), उमेश बिराजदार (50, दोघे रा. लातूर), प्रभू शिंदे (60, करडखेल), प्रभू ढाले (12, घोणसी), मनीषा नागरगोजे (12, गोजेगाव), शारदा जाधव (30, हंगरगा), पूजा नागरगोजे (12), प्रभू चिल्ले.


गंधकाचे अंश
स्फोट बसच्या इंजिनचा नसून शोभेच्या दारूचा असावा. स्फोटकात गंधकाचे अंश आढळले. स्फोट चालकाच्या दोन सीट सोडून मागच्या बाजूला झाला आहे. स्फोटक पदार्थ कोणी ठेवले किंवा वाहून नेणाराही जखमी झाला आहे का, याचा तपास सुरू आहे, असे लातूरचे पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर यांनी सांगितले.