आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील भोंदू बाबांवर फास; नांदेडमध्ये गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ज्या कायद्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्या कायद्यांतर्गत मराठवाड्यात पहिला गुन्हा भाग्यनगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. उत्तर प्रदेशातील साहिलखान लियाकत खान (25) व अमिरोद्दीन अब्दुल लतीफ (40) या दोन आरोपींविरुद्ध बुधवारी नवीन जादूटोणाविरोधी अध्यादेश कलम 3 (2) अन्वये गुन्हा नोंदवला.


साहिलखान व अमिरोद्दीन या दोन आरोपींनी तरोडेकर चेंबर्समध्ये दवाखाना थाटून असाध्य रोगावर इलाज करण्याचा दावा केला. वृत्तपत्रांत जाहिराती देऊन त्यांनी कॅन्सर, डायबिटीस, वंध्यत्व आदी असोध्य रोगांवर इलाज करण्याची हमी दिली. जवळपास 125 लोकांवर त्यांनी उपचार करून त्यांच्याकडून पैसे उकळले. पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक केली.


अंनिसची मागणी
आरोपींवर जादूटोणाविरोधी अध्यादेशातील कलमानुसार कारवाई करता येते, याची कल्पना पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांना ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने दिली. अंनिसचे प्रा. शिवदास हामंद यांनी मंगळवारी पोलिस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांची भेट घेऊन आरोपींवर नव्या कायद्यान्वये कारवाईची मागणी केली होती.


125लोकांवर उपचार करून उकळले पैसे
1954 च्या कायद्यान्वये कारवाई


7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
असाध्य रोगाला अतींद्रिय शक्तींचा वापर करून अथवा गंडे, दोरे, मंत्र, तंत्र यांच्या साहाय्याने बरे करण्याची जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वंध्यत्व निवारण, जादूटोणा, घरातील वाद, मालमत्तेचे वादही अशा प्रकारे बरे करण्यासाठी लोकांकडून पैसे उकळणे हा या कलमान्वये गुन्हा मानण्यात आला आहे. यासाठी 6 महिन्यांपासून ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या गुन्ह्यात न्यायालयातून जामीन मिळवावा लागतो.


शासकीय उदासीनता
दाभोलकरांच्या हत्येनंतर जनक्षोभ थांबवण्यासाठी शासनाने जादूटोणाविरोधी कायद्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. 25 ऑगस्टला राज्यपाल शंकरनारायणन यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. मंगळवारी दोन आरोपींविरुद्ध 1954 कायद्यान्वये कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात नव्या कायद्यान्वये कारवाई करता येते ही बाब ‘दिव्य मराठी’ने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. राजपत्राची अधिकृत प्रत पोलिसांजवळ नव्हती. अंनिसचे प्रा. शिवदास हामंद यांनी ती प्रत दिली.


अंमलबजावणीसाठी अधिकारी नेमावा
नवीन जादूटोणाविरोधी कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा नोंदवल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. हा अध्यादेश काढल्याबद्दल शासनाचेही आभार. हा कायदा आता दोन्ही सभागृहांत मंजूर करून तत्परतेने अमलात आणावा. तसेच या कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता अधिकारी नेमावा. या कायद्यानुसार गुन्हा नोंदवल्याबद्दल जेवढा आनंद आहे तेवढेच दाभोलकरांच्या हत्येनंतर हा अध्यादेश अमलात आला याचे दु:ख आहे.
- प्रा. शिवदास हामंद, राज्य सरचिटणीस, अंधश्रद्धा निर्मूलन समिती