आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीवायएसपी असल्याचे सांगून तरुणीची भामटेगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मी नवीन डीवायएसपी, नुकतीच जॉइन झाले. सध्या विश्रामगृहात राहते. माझे सामान येणार आहे, तोपर्यंत मला फ्रीज वगैरे वस्तू घेऊन द्या, अशी थाप मारत घरमालकाला गंडवण्याचा प्रयत्न करणा-या तरुणीची भामटेगिरी परतूरमध्ये शनिवारी उघड झाली. विशेष म्हणजे पोलिस उपअधीक्षकांच्या क्वार्टरच्या भिंतीला लागूनच असलेल्या विश्रामगृहातच या तरुणीने १२ दिवस मुक्काम ठोकला होता. सरिता रामराव कुलकर्णी (२२, खानापूर फाटा, परभणी) असे नाव असलेल्या या तोतया डीवायएसपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

डीवायसपी असल्याचा बनाव करणा-या सरिताने पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले आहे. यामुळे पोलिसांबद्दलची प्राथमिक माहिती तिला अवगत आहे. शिवाय, तिचे राहणीमान, भाषासुद्धा पोलिसांना साजेशीच होती. यामुळे कुणाला साधी शंकासुद्धा आली नाही. डीवायएसपी असल्याचे सांगूनच तिने शासकीय विश्रामगृहात दालन मिळवले. ढोबळे यांच्या तक्रारीवरून परतूर पोलिसांनी सरिताला अटक केली. पुढील तपास निरीक्षक वाय. के. शेवगण करत आहेत.

असे उघडे पडले पितळ
परतूरच्या स्टेट बॅँक ऑफ हैदराबाद शाखेचे सुरक्षा रक्षक प्रभाकर ढोबळे यांची रूम सरिताने भाड्याने घेतली. गावाकडून सामान येणार आहे. तोवर काही सामान खरेदी करायचे असल्याचे तिने सांगितल्याने ढोबळेंनी ओळखीच्या दुकानातून फ्रीज घेऊन दिला. मात्र ती फ्रीज अन्यत्र नेत होती. यामुळे शंका आल्याने ढोबळेंनी पोलिसांना कळवले. महिला कर्मचा-यांना घेऊन पोलिस विश्रामगृहावर धडकले. सुरुवातीला सरिताने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने सत्य सांगून टाकले.

औरंगाबादेतही फसवणुकीचा गुन्हा
सरिता कुलकर्णी हिने औरंगाबादेतही पोलिस कर्मचारी, पीएसआय असल्याची बतावणी केली होती. दोन महिन्यांपूर्वी सिडको पोलिस ठाण्यात असाच फसवणुकीचा गुन्हा तिच्यावर दाखल झाला होता. पोलिस निरीक्षकांच्या आदेशावरून सरिताला पकडून आणले होते, असे सिडकोचे उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी सांगितले.

तोतया जजकडून २७४० जणांना जामीन
दिल्लीतही पोलिसांनी धनीराम नावाच्या ७७ वर्षीय ठकसेनास अटक केली. धनीरामच्या माहितीनुसार, हरियाणातील झज्जर येथील एका अतिरिक्त सत्र न्यायाधीशाविरुद्ध चौकशी सुरू होती. धनीरामने बनावट पत्र तयार करून या न्यायाधीशाला सुटीवर पाठवले आणि दोन महिने त्याच्या खुर्चीवर बसून काम चालवले. दोन महिन्यांत त्याने २७४० जणांना जामीन दिला.