आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातामुळे कुटुंबावर गावबंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - अडीच महिन्यांपूर्वी भीषण अपघातात उपळाई (ता. कळंब) येथील 15 जणांचा बळी गेला होता. मात्र, या अपघाताच्या घटनेचे आजही उपळाईवर भयंकर सावट आहे. यामुळे एका कुटुंबास अडीच महिन्यांपासून गावबंदी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी एक वेळा समक्ष मारहाण होऊनही पोलिस मूग गिळून गप्प असल्याने या कुटुंबास आजही घरादाराला कुलूप लावून, शेतीवर वरवंटा फिरवून येरमाळा येथे आर्शिताचे जीवन जगावे लागत आहे.

तुळजापूर येथे 19 फेब्रुवारी रोजी देवकार्य आटोपून परतणार्‍या पिकअप टेम्पोस कंटेनरची धडक बसल्याने एकाच गावातील 15 जणांचा बळी गेला. यामधील चार तरुण हे कुटुंबातील एकुलते वारस होते. त्यांच्या जाण्याने आई-वडिलांचा वृद्धापकाळातील मोठा आधार हिरावला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व मृतांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारास ज्यांच्या देवकार्यासाठी सदरील मंडळी गेली होती त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नसल्याने दु:खाचा डोंगर सरून द्वेषभावना समोर आली. यातूनच त्रिशला मुंढे व त्यांच्या कुटुंबीयांवरील रोष वाढला. त्रिशला मुंढे यांचे पती भाऊनाथ मुंढे व सुनील आणि अनिल अशी दोन मुले, असे चौघांचे कुटुंब आहे. त्यांच्यावर गावात येण्यास बंदी घालण्यात आली. तेव्हापासून त्रिशला मुंढे यांच्या घराला कुलूप लागले आहे. त्यांच्याकडे असणारे स्वस्त धान्य दुकानाचीही वितरण व्यवस्था इतरत्र करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. वास्तविक पाहता त्रिशला मुंढे यांनी देवकार्याच्या जेवणासाठी ग्रामस्थ व पाहुण्यांना आमंत्रित केले होते. परंतु, मद्याचा अंमल जास्त झाला आणि या भीषण संकटास समोरे जावे लागले.

यापूर्वी घटनेनंतर काही दिवसांनी त्रिशला मुंढे व कुटुंबीयांनी गावात परतण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना धमकावण्यात आल्याने त्यांनी 24 मार्च रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात तक्रार देऊन स्वत:सह कुटुंबीयांना ग्रामस्थांपासून धोका असल्याचे नमूद केले. त्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांना सोबत घेऊन मुंढे कुटुंबीयांनी गावात प्रवेश केला, परंतु पोलिसांसमक्षच त्यांना मारहाण झाल्याने ते संपूर्ण कुटुंबीय सध्या येरमाळा येथे आर्शिताचे जीवन जगत आहे. दरम्यान, त्रिशला मुंढे यांच्या उपळाई शिवारातील शेतात ज्वारी, गहू, कांदे आदी पिके होती. मात्र, घटनेनंतर या कुटुंबास गावबंदी केल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले. बाहेरगावी राहून शेतीकामासाठी काही मजूर पाठवण्यात आले. मात्र, त्या मजुरांना मृत्यू पावलेल्यांच्या नातलगांनी धमकावून कामास मज्जाव केला.

संरक्षण देणे अशक्य
गावातील वातावरण त्रिशला मुंढे यांच्याविरोधात आहे. वातावरण निवळेपर्यंत काही महिने त्यांनी बाहेरच राहावे. त्यांना पूर्णवेळ संरक्षण देणे शक्य नाही. राजेंद्र मोताळे, सहायक पोलिस निरीक्षक, येरमाळा

पाच लाखांची मागणी
तुमच्या देवकार्यासाठी आल्यामुळेच आमची माणसे मेली. मृताच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपयांची व जखमींना तीन लाख रुपये द्या, तेव्हाच तुम्हाला गावात येऊ देऊ, नाहीतर या घटनेचा बदला घेऊ, अशी धमकी मृतांच्या नातलगांकडून होत असल्याचे त्रिशला मुंढे यांनी सांगितले.

स्वस्त धान्य दुकानावर डोळा
त्रिशला मुंढे यांचे उपळाईत अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान आहे. काही संधिसाधूंनी धान्य दुकान नावाने केल्यास यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावरून काहींनी दुकानाचा परवाना रद्द करण्याचीही तक्रार प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे या घटनेचा फायदा उचलण्याचा काहीजणांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

माझा एकुलता एक मुलगा अमोल शिक्षणासाठी उस्मानाबादेत असतो. सुट्यांसाठी गावाकडे आल्यानंतर कटिंग करण्यासाठी येरमाळ्यास जातो म्हणून बाहेर पडला; परंतु त्रिशला मुंढे हिच्या मुलाने बळजबरीने त्यास गाडीत बसवून देवकार्यास नेले. या अपघातास सर्वस्वी त्रिशला मुंढेचे कुटुंब जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोदाबाई बजरंग मुंढे, अपघातातील मृताची आई