आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत ‘फँड्री’वरून थिएटरवर हल्ला, तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या फँड्री चित्रपटातील दृश्ये व संवादांवरून उस्मानाबादेत वाद निर्माण झाला आहे. या दृश्यास आक्षेप नोंदवत तरुणांच्या घोळक्याने श्री चित्रपटगृहावर जोरदार दगडफेक करून पोस्टरही फाडले. त्याचबरोबर रस्त्यावरील चार वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.
आठवडाभरापूर्वी रिलीज झालेला बहुचर्चित फँड्री चित्रपट शुक्रवारपासून उस्मानाबादेतील श्री चित्रपटगृहात झळकला; परंतु पहिल्याच दिवशी दोन शो व्यवस्थित पार पडल्यानंतर तिसर्‍या शोदरम्यान यातील एका दृश्याला आक्षेप नोंदवत शहरातील तरुणांच्या एका घोळक्याने थिएटरवर तुफान दगडफेक करून शो बंद पाडला. या वेळी पोस्टर फाडण्यात येऊन थिएटरसमोर मुख्य रस्त्यावरील स्कॉर्पिओ (एमएच 04 डीएन 4466), स्विफ्ट डिझायर (एमएच 25 आर 3860) या दोन वाहनांवरही दगडफेक करत मोठे नुकसान करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता हा जमाव हुल्लडबाजी करत स्टेडियमच्या दिशेने गेला. या वेळी जाताना या जमावाने स्टेडियमजवळील यशराज लॉन्सजवळील बोलेरो जीप (एमएच 25 आर 2313) व इंडिका कारवर (एमएच 25 आर 1949) दगडफेक करून नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश घाडगे, उपनिरीक्षक शहाणे यांनी थिएटरकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत जमाव घटनास्थळावरून निघून गेला होता.