आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णा स्थानकावर रेल्वेची बोगी जळून खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - पूर्णा येथील रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाडीच्या बोगीला शुक्रवारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण डबा जळून खाक झाला. या आगीमागील निश्चित कारण समजू शकले नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केले होते.
हैदराबाद-पूर्णा ही पॅसेंजर रेल्वे गुरुवारी (दि. दोन) रात्री साडेनऊच्या सुमारास नेहमीच्या वेळेप्रमाणे पूर्णा स्थानकावर येऊन थांबली होती. रेल्वेस्थानकाच्या बाजूस असलेल्या यार्डात या रेल्वेला रात्री बारा वाजून ४० मिनिटांनी आणून सोडण्यात आले. त्यानंतर एकच्या सुमारास बोगी क्रमांक ९८४०४ च्या डब्यातून अचानक धूर व आगीचे लोळ उठले.
रेल्वे कर्मचारी व नागरिकांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. याच वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी हा जळता डबा रेल्वेच्या इतर डब्यांपासून वेगळा करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. तो डबा वेगळा करून दूर नेण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. त्या ठिकाणी पूर्णा पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत संपूर्ण डबा जळून खाक झाला होता. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.

रेल्वेचे विभागीय तांत्रिक अधिकारी आप्पाराव, अधिकारी विक्रमा दत्त, विभागीय सुरक्षा अधिकारी कमलाकर राव, विभागीय वीज तांत्रिक अधिकारी गंगाराजू, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. एस. मलदोडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीचा हा प्रकार शॉर्टसर्किटने झाला असावा वा तो घातपाताचा प्रकार असावा, याबाबत रेल्वे प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, या आगीचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.